आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhu Vikas Bank Payment Issue At Amravti. Divya Marathi

23 महिन्यांपासून नाही वेतन, भू-विकास बॅँकेची स्थिती दयनीय स्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भू-विकास बँकेतील कर्मचार्‍यांचे वेतन आणि सेवानिवृत्तीचे तब्बल चार कोटी 30 लाख थकित असल्याची माहिती समोर आली आहे. वेतनाचे दोन कोटी 30 लाख रुपये, तर सेवानिवृत्ती वेतनाचे दोन कोटी रुपये थकित असल्याने भू-विकास बँकेचे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. वेतन आणि सेवानिवृत्ती वेतनदेखील मिळत नसल्याने कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांचे हाल होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शेतकर्‍यांना आर्थिक सबळ करता यावे म्हणून शासनाने भू-विकास बँकेचे गठण केले. शेतकर्‍यांच्या हितासाठी गठण करण्यात आलेल्या बँकेची स्थिती शेतकर्‍यांप्रमाणेच झाली आहे. शासनाकडून बँक अवसायनात काढल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कर्मचार्‍यांवरदेखील आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. भू-विकास बँकेच्या अमरावती कार्यालयांतर्गत कर्तव्यावर असलेल्या सावरखेड येथील राजेंद्र काळबांडे या कर्मचार्‍यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. अवघे 45 वर्षे वय असलेले काळबांडे वेतन नसल्याने कर्जाच्या बोजाखाली दबल्याची माहिती आहे.
काळबांडे यांनी आणखी तब्बल 15 वर्षे बँकेत सेवा दिली असती; मात्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांचे वेतन तर सोडाच; 2009 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना बँकेकडून दमडीही मिळाली नसल्याचे वास्तव आहे. या सार्‍या प्रकारामुळे आजी-माजी कर्मचार्‍यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नैराश्य आले असून, कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.