अमरावती - उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे सायन्सस्कोर मैदानात सभा होणार ही नाही, याबाबत संभ्रम कायम होता. मात्र, मैदानात उतरल्यानंतर ऊन, वारा, पावसाची आता पर्वा नाही. शिवसेना एकटी पडली म्हणणाऱ्यांना जनताच उत्तर देणार आहे. विधानसभेच्या निकालानंतर साथ सोडून जाणारेच एकटे पडतील, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
गोपिनाथ मुंडे असते, तर महाराष्ट्रात येण्याची गरज पडली नसल्याचे मोदी म्हणत आहेत. महाराष्ट्रासाठी फार काही करण्याचे दिवंगत मुंडे आणि मी ठरवले होते. केंद्रात सरकार आल्यानंतर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत मुंडे बोलणार होते. शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याबाबत मागणी करणार होते. लोकसभेत भाजप बरोबर शिवसेनेच्या मतांनीदेखील
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जाणार असल्याचे ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले.
शिवसेनेने मोदींसाठी महाराष्ट्र पालथा घातला; मात्र शिवसेनेसाठी मोदी फिरताहेत का? मग कोणी कोणाचा उपयोग करून घेतला, असा प्रतिप्रश्न त्यांनी जनतेला केला. युती जागा वाटपावर नव्हती, तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होती, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांसह त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवरदेखील प्रहार केले. विदर्भात आल्यानंतर बुलडाणा येथे पावसामुळे चिखलाचे दर्शन झाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रात असाच चिखल केला. एकमेकांवर आरोप चिखलफेक करताना त्यांना चिखल कमीदेखील पडणार नसल्याचे ते म्हणाले. जाहिरातीपेक्षा हा पैसा विदर्भात खर्च केला असता, तर येथील सिंचनात वाढ झाली असती, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
सभेचे प्रस्तावित खासदार आनंदराव अडसूळ यांनी केले. या वेळी दिवाकर रावते, माजी खासदार अनंत गुढे, लोकसभेचे निरीक्षक अनिल चव्हाण, जिल्हा प्रमुख संजय बंड, आमदार अभिजित अडसूळ, बाळासाहेब हिंगणीकर, सहसंपर्क प्रमुख दिनेश नाना वानखडे, प्रा. प्रशांत वानखडे, महानगर प्रमुख दिगंबर डहाके, बाळासाहेब भागवत, प्रदीप बाजड, सिद्धेश्वर चव्हाण, सुरेखा ठाकरे, मोतीलाल कास्देकर, उमेश यावलकर, सुधीर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
पाच मिनिटांत उभारले स्टेज
पावसाचेवातावरण असल्याने सायन्सस्कोर मैदानात सभा होईल किंवा नाही, याबाबत संभ्रम कायम होता. दुसरीकडे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात देखील तयारी आरंभली होती. मात्र, मैदानातच पावसातच सभा घेण्याचे संकेत ठाकरेंकडून मिळाल्याने कार्यकर्त्यांनी तयारी आरंभली. अवघ्या पाच मिनिटांत फलक खुर्च्या लावत स्टेज उभारले.
पाऊस भाषणाला सोबत सुरुवात
उद्धवठाकरे यांचे स्टेजवर आगमन होतात पावसानेदेखील हजेरी लावली. पाऊस होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी भाषणास सुरुवात केली. मैदानात उतरल्यानंतर ऊन, वारा, पावसाची चिंता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुम्हीदेखील तयार असल्याचा प्रश्न उपस्थितांना केला. त्या वेळी उपस्थित अमरावतीकरांनी देखील हात उंचावून उद्धव ठाकरे यांना प्रतिसाद दिला.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी महायुती तोडल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सायन्सस्कोर मैदानात झालेल्या सभेत केली. सत्ता, खुर्चीसाठी नाही, तर हिंदुत्व कायम राहावे म्हणून युती करण्यात आली होती. हिंदुत्व धोक्यात येईल म्हणून प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांनी ताणल्याचे अनेक प्रसंग आले; मात्र युती कधीच तोडली नाही, हे सांगण्यासदेखील ते विसरले नाहीत.