आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 ऑगस्ट रोजी भाजपची पहिली यादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणे निकालाची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता असून विदर्भातील 100 टक्के जागा महायुती घेईल, असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. दरम्यान, 15 ऑगस्टला भाजपची विधानसभेची पहिली यादी जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. बुलडाणा येथे जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे इच्छूक असलेल्या 52 जणांच्या मुलाखती जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक या नात्याने त्यांनी स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये घेतल्या. त्यांच्या समवेत औरंगाबादचे माजी महापौर तथा सहाय्यक पक्षनिरीक्षक डॉ. भागवत कराड, आमदार पांडुरंग फुंडकर, चैनसुख संचेती, आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. संजय कुटे प्रामुख्याने उपस्थित होते. या मुलाखतीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.

पक्षनिरीक्षक गिरीश महाजन म्हणाले की, तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 15 टीम प्रत्येकी दोन जिल्ह्यात जाऊन उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. 1 ऑगस्टपासून 4 किंवा 5 ऑगस्टपर्यंत त्या चालणार आहेत. त्यानंतर पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होऊन त्यात चर्चा व छानणी होऊन राज्यातील संभाव्य उमेदवारांची पहिली 15 ऑगस्टला जाहीर होईल, असे ते म्हणाले. तसेच केंद्रात भाजपप्रणित सरकार आले आहे. त्यामुळे अपेक्षाही भरपूर आहेत. विधानसभेतही त्याचा कित्ता गिरवल्या जाईल. तोलामोलाचे उमेदवार बुलडाणा जिल्ह्यात असून येथून आम्हाला चांगली अपेक्षा आहे. सोबतच जिल्ह्यात पूर्वी निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये बदल होणार नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या संकेत दिले. तसेच सातत्याने पराभवाचा सामना कराव्या लागणा-या व शिवसेनेला सुटलेला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघावर यावेळी भाजपने दावा सांगितला आहे. वाटाघाटीत त्यात बदल होण्याची शक्यता असून प्रसंगी दुसरी जागा दिल्या जाऊ शकते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात मतदारसंघनिहाय दोन ते तीन सर्व्हे केले असून त्याच्या अहवालावरही ब-याच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. चिखली हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ असल्याचे सांगत जागांबाबत महायुतीतील चारही पक्षांशी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहे, असे महाजन यांनी सांगितले.
पहिल्या यादीत पहिल्या फळीतील नेते
15 ऑगस्टला जाहीर होणा-या भाजपच्या पहिल्या यादीत विजयाचा निकष, तक्रार नसलेले तथा पक्षाने केलेल्या सर्व्हेमध्ये निर्विवाद वाटणा-या मतदार संघातील उमेदवारांच्या नावाचा समावेश राहील असे आमदार गिरीश महाजन यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
सत्तेत असलेल्या पक्षांचे अनेक आजी, माजी पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. अनेक जण वेटींगवर आहेत. गुंडागर्दी करणा-यांना आमच्या पक्षात प्रवेश नाही. सत्तेत असलेल्यांना त्यांची सत्ता आता येणार नसल्याचे कळून चुकले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सोबतच भाजप हा सर्वसमावेशक पक्ष असल्याचे ते म्हणाले.

राणेंनी संपर्क केला नाही- फुंडकर
नारायण राणेंसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार पांडुरंग फुंडकर यांना विचारणा केली असता राणेंनी आपल्याशी संपर्क केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस बोलले असतील तर आपणास त्याची कल्पना नाही, असेही ते म्हणाले.