आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालाजींच्या नकाराचा फॅक्स; कार्यकर्त्यांनी घेतला धसका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला पश्चिम मतदारसंघाचे चार वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी तिकीट नको असल्याचा फॅक्स वरिष्ठांकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचा कार्यकर्त्यांनी धसका घेतला आहे, तर आज पक्षाच्या दोन निरीक्षकांसमोर तीन विधानसभा मतदारसंघांसाठी सुमारे 100 इच्छुक नेते व कार्यकर्त्यांनी तिकीट मागितले.
सर्वाधिक इच्छुक हे बाळापूर येथे असल्याने निरीक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले. आज भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत धुळे येथील आमदार व युवा मोर्चाचे महामंत्री जयकुमार रावल, नाशिक येथील नगरसेविका व महाराष्ट्र प्रदेश सचिव सिमा हिरे यांच्यासमोर मागणी नोंदवली. या वेळी अकोट व अकोला (पूर्व) या युतीत शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघावरही निरीक्षकांनी मत जाणून घेतले.

...पाचव्यांदा लालाजीच हवे
चार वेळा पश्चिम विभागाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे, व्यापक जनाधार असलेले नेते व भाजपप्रमाणेच जनतेत लोकप्रिय असलेले आमदार गोवर्धन शर्मा यांनी पाचव्यांदा विक्रमी मताधिक्याने विधानसभेत निवडून जावे व अकोला पश्चिमचे प्रतिनिधित्व करावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. प्रतिकूल परिस्थितीत लालाजींनी पक्षाचे नेतृत्व केले, आता अनुकूल परिस्थितीतही त्यांनी प्रतिनिधित्व करावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. असे असताना प्रदेश कार्यालयात उमेदवारी नको असा फॅक्स आमदार शर्मा यांनी केल्याचे वृत्त कार्यकर्त्यांच्या कानी पडल्याने ते व्यथित झाले आहेत.

जागा तीन, इच्छुक शंभर
भाजपकडे मूर्तिजापूर, अकोला (पश्चिम) व बाळापूर हे तीन मतदारसंघ आहेत. यापैकी बाळापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास सर्वाधिक अर्थात 67 इच्छुकांनी दावेदारी केली आहे, तर मूर्तिजापूर येथे 22, तर अकोला (पश्चिम)मध्ये 11 इच्छुकांनी दावेदारी केली आहे. ही दावेदारी पाहता निरीक्षकांनी बाळापुरात इतके इच्छुक कसे, असा प्रश्न उपस्थित केला. या वेळी दोन मतदारसंघांवर दावा करणा-या एका इच्छुकाची निरीक्षकांनी कानउघाडणी केली.

बंडखोरांना तिकीट नकोच, एकमुखी मागणी
विधानसभेत दावेदारी करणा-यांनी लगेच होणा-या महापौरपदासाठी दावेदारी करू नये, असे मत नगरसेवकांनी मांडले, तर नगरसेवकांना व कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणा-या नेत्यांना व पक्षात बंडखोरी करत आतबाहेर करणा-या नेत्यांना विधानसभेत तिकीट देऊ नये, अशी विनंती भाजप नगरसेवकांनी केली आहे.

वीस दिवसांत तिकीट होतील निश्चित
वीस दिवसांत भाजप येथील उमेदवारी निश्चित करेल, अशी माहिती पक्ष निरीक्षकांनी कार्यकर्त्यांना दिली. तर पक्षाच्या वतीने येथे व्यापक सर्व्हे सुरू असून, त्याची पाहणी व निरीक्षकांच्या अहवालानंतरच तिकीट निश्चित केले जातील तसेच अकोला (पूर्व) व अकोट यावर दावा करताना अकोला (पूर्व) ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मागणी केल्याची माहिती मिळाली.