अमरावती - प्रत्येक माणसाचे आयुष्य नेहमीच अंधार-उजेडाने भरलेले असते. दिवस-रात्र या नैसर्गिक प्रक्रियेतून
आपल्या वाट्याला आलेल्या अंधार-उजेडाची गणितं आपण विणत असतो. अंधारात आपण स्वप्न विणतो, तर उजेडात ती साकार करण्यासाठी धडपडत असतो. मात्र, मुळातच नेत्रहीन असलेला २१ वर्षीय जलतरणपटू आपल्या आयुष्यातील अंधार वाटेत यशाचे किरण प्रज्वलित करून जलतरणात मोठे नाव कमावण्यासाठी सध्या धडपड आहे.
किरण शिवरामजी चव्हाण असे त्या गुणी जलतरणपटूचे नाव आहे. महिनाभरापूर्वी मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत किरणने पाच सुवर्णपदकांची कमाई केली. आगामी काळात कोकण चायना खाडी पार करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.
यवतमाळमधील दिग्रस तालुक्यातील साखरा गावचा राहिवासी असलेला िकरण सध्या शहरातील केशरबाई लाहोटी महाविद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षाला शिकत आहे. शिक्षणासोबतच किरण हा उत्कृष्ट जलतरणपटूही आहे. प्रशिक्षक प्रशांत गाडगे यांच्या तालमीतच त्याने जलतरणाचे बाळकडू घेतले आहेत. किरण हा शहरातील निंभोरा वसतिगृहात राहतो. सकाळी आठ वाजता त्याचे कॉलेज राहायचे. मात्र, त्यापूर्वी तो एक तास जलतरणाचा सराव करायचा. यासाठी तो सकाळी साडेसहाच्या सुमारास एक किलोमीटर पायदळ बडनेरा मार्गावर यायचा. या ठिकाणाहून शहर बसने नवाथे चौकात किंवा समर्थ हायस्कूल जवळ उतरायचा.
प्रशिक्षकांचा मोठा वाटा
या संपूर्ण यशात प्रशिक्षक प्रशांत गाडगे यांचा मोठा वाटा आहे. मला अनेकदा ते नवाथेवर घ्यायला येत होते, कधी
कॉलेजमध्ये सोडून द्यायचे. जलतरणाचे ज्ञान त्यांनीच दिले. त्यांच्यामुळेच मला आजपर्यंतचे यश मिळाले आहे. पुढेही त्यांच्यामुळेच मला यश मिळणार आहे, असे किरण चव्हाणने सांगितले.
डोळसांच्या बरोबरीने काम करू शकतो
मी नेत्रहीन आहे, या बाबीचा बरेचदा त्रास होतो. मात्र, नेत्रहीन आहे म्हणून काही करू शकत नाही, असे नाही. अशावेळी इतर नेत्रहिनांनी मेहनत करून यश मिळवावे. नेत्रहीन व्यक्तीसुद्धा डोळस व्यक्तींच्या बरोबरीने राहू शकतो, डोळसांप्रमाणेच नेत्रहीनसुद्धा यश मिळवू शकतो. त्यामुळे नेत्रहिनांनी खचून जाऊ नये. किरणचव्हाण, जलतरणपटू.