आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blood Bank Condition Not Well In Amaravati District

रक्त संकलन केंद्र धूळखात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूररेल्वे - येथील ग्रामीण रुग्णालयात भरती होणा-या तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना तातडीने रक्तपुरवठा व्हावा, या उदात्त हेतूने तीन वर्षांपूर्वी रक्त संकलन केंद्र उभारण्यात आले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्राचे विद्युतीकरण न केल्यामुळे केंद्राची इमारत व लाखो रुपयांची यंत्रसामुग्री धूळखात पडली आहे. त्यामुळे रुग्णांची व नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

दरम्यान, ‘रक्तदान श्रेष्ठ दान’, ‘रक्तदान करा’ अशा अनेक घोषवाक्यांद्वारे नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देणा-या प्रशासनाच्या या दुर्लक्षित धोरणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तीन वर्षांपूर्वी रक्त संकलन केंद्राच्या बांधकामासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पाच लाख रुपयांचा निधी दिला होता. त्यापैकी चार लाख 37 हजारांमध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. उरलेल्या पैशात बांधकाम विभागाने केंद्राचे विद्युतीकरण किंवा ते पैसे ग्रामीण रुग्णालयाला परत करणे अपेक्षित होते. परंतु, वेळोवेळी तांत्रिक त्रुट्या काढून सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळ मारून नेल्याचे दिसते.

घात, अपघात, तातडीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रक्ताची नितांत गरज असते. वेळेवर जर रक्त उपलब्ध झाले नाही, तर रुग्णाच्या जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. अशा प्रसंगी महत्त्वपूर्ण ठरणा-या रक्त संकलन केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध असताना फक्त वीजपुरवठ्याअभावी मागील तीन वर्षांपासून ते धूळखात पडले आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता पी. आर. सरनाईक हे रुग्ण कल्याण समितीवर सदस्य म्हणूनही काम पाहतात. शिवाय समाजातील विविध स्तरातील अनेक प्रतिष्ठीत नागरिक या समितीवर असूनही त्यांना मागील तीन वर्षांत रक्त संकलन केंद्राचा तिढा सोडवता आलेला नाही.

शीतपेटीही पडली बेवारस
बेवारस स्थितीत आढळलेले मृतदेह त्यांचे नातेवाईक येईपर्यंत ठेवता यावे, यासाठी शासनाने ग्रामीण रुग्णालयाला उपलब्ध करून दिलेली शवशीतपेटी इमारत नसल्यामुळे रुग्णालयाबाहेर बेवारस स्थितीत ठेवण्यात आली आहे. यावरून येथे आढळणा-या बेवारस मृतदेहाची काय स्थिती असेल, याची कल्पना येते.
औषधीसाठी नाही जागा औषधी साठवण्याकरिता जागाच नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाला मिळणारा जवळपास ट्रकभर औषधसाठा जिल्ह्याच्या ठिकाणीच ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधी खरेदी करण्यास सांगितले जाते. हा प्रकार खिशाला चाट लावतो.

प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही
रुग्णालयात मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता आहे. रक्त संकलन केंद्राचे विद्युतीकरण, शवशीतपेटी आदी समस्यांविषयी बांधकाम विभागाशी अनेकदा चर्चा केली. परंतु, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचा-यांचा प्रतिसाद मिळाला नाही.
बाळासाहेब सोरगीवकर, सदस्य, रुग्ण कल्याण समिती.
शिल्लक पैशातून व्हावे केंद्राचे विद्युतीकरण
- रक्त संकलन केंद्रासाठी पाच लाखांचा निधी दिला. त्यापैकी चार लाख 37 हजार रुपये खर्च झाले. उर्वरित पैशांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने विद्युतीकरण करून द्यावे किंवा शिल्लक पैसे परत करावे. औैषधी साठवण्याकरिता एखादे क्वॉर्टर रिकामे करून तेथे लवकरच व्यवस्था होईल. डॉ. लीना जाजू , वैद्यकीय अधीक्षक.

विद्युतीकरण हे आमच्या विभागाचे काम नाही
रक्त संकलन केंद्राच्या विद्युतीकरणाशी सार्वजनिक बांधकाम विभागाचा संबंध नाही. बांधकामात विद्युतीकरणाचा समावेश नव्हता. ग्रामीण रुग्णालयाचे फक्त 18 हजार रुपये शिल्लक असून, त्यात विद्युतीकरण होणार नाही. ते पैसे परत करण्याची आमची तयारी आहे.
पी. आर. सरनाईक, सहायक अभियंता.

अधिका-यांमध्ये आहे समन्वयाचा अभाव
रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत चर्चा करून या समस्यांकडे अधिका-यांचे लक्ष वेधले. परंतु, बांधकाम विभाग, पंचायत समिती व ग्रामीण रुग्णालयातील अधिकाºयांमध्ये समन्वय नसल्याने समस्या ‘जैसे थे’ आहेत. अधिकारी ये-जा करतात. त्यांना नागरिकांच्या समस्यांशी देणेघेणे नाही.
नीलेश विश्वकर्मा, सदस्य, लोकप्रतिनिधी.
चांदूररेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयाशेजारी तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेले रक्त संकलन केंद्र विद्युतीकरणाअभावी धूळखात पडल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.