आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिषा पटेलने साधला अमरावतीकरांशी संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- ‘आपण देशाला केवळ भूमी न म्हणता ‘मातृभूमी’ असे संबोधून देशाप्रति अतीव आदर व्यक्त करतो. दुसरीकडे जिवंत महिलांवर नानाविध अत्याचार व स्त्रीभ्रूणांची हत्या करून मातृशक्तीचा घोर अपमान करीत आहोत. या दुटप्पी धोरणामुळेच आज समाजात अनेक गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. घराचे घरपण टिकवण्यासाठी अहोरात्र राबणार्‍या महिलांना हीन न लेखता, योग्य संस्कार आणि शिक्षणाची समान संधी दिल्यास देशाचा सर्वांगीण विकास होईल,’ असे आवाहनात्मक प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेत्री अमिषा पटेल हिने केले.

प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट, शोध प्रतिष्ठान आणि अमरावती गार्डन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सायंस्कोर मैदानावर आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी अमिषाच्या हस्ते झाले. या प्रसंगी आयोजक माजी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड, जिल्हाधिकारी राहुल महिवाल, पोलिस आयुक्त अजित पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, मुंबई येथील ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश हिंगलासपूरकर, अमरावती गार्डन क्लबचे सी. एम. देशमुख, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. किशोर शेळके, ग्रामीणचे अध्यक्ष विजय भैसे, चेतन पवार, अविनाश मार्डीकर, संजय आसोले, प्रशांत डवरे, संजय शिरभाते यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

घरातील संस्कार आणि शिक्षणामुळेच महिलांचा सन्मान होतो. त्यामुळे देशातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा गंध पोहचायला हवा. शिक्षणाचा पाया मजबूत झाल्याशिवाय स्त्रीभ्रूणहत्या व महिलांवरील अत्याचार थांबणार नाहीत, असे सांगून प्रसार माध्यमांद्वारे महिलांवर अत्याचार होणार्‍या घटना जेव्हा बघते, तेव्हा अंत:करण दु:खाने भरून जाते, अशी खंतही अमिषाने व्यक्त केली.

तीन दिवस चालणार्‍या सांस्कृतिक महोत्सवात विदर्भस्तरीय पुष्पप्रदर्शन व स्पर्धा, चित्रकला प्रदर्शन व स्पर्धा, बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन तसेच अभ्यासिका कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी उद्घाटन सोहळ्यानंतर सायंकाळी पाच वाजता हिंदी व मराठी सिनेगीतांवर आधारित ‘स्वर शोध’ स्पर्धेत प्रेक्षकांनी सुमधुर गीतांचा आस्वाद घेतला. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक सुलभा खोडके यांनी केले. सूरज हेरे यांनी संचालन केले. त्यांच्या शेरोशायरीला हजारो प्रेक्षकांनी भरभरून दाद देत आपणही अमिषाचे चाहते असल्याचे दाखवून दिले.