आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बीपीएल’ धनिकांना बसणार मनपाचा चाप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) नागरिकांच्या यादीतून धनिकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेला लवकरच सुरुवात होणार असून, आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी त्यासाठी गोपनीय यंत्रणा कामाला लावली आहे. जेवढी नावे कमी होतील तेवढीच खऱ्या गरिबांची नावे यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.
अमरावती शहरातील सुमारे ४० हजार कुटुंब दारिद्र्यरेषेखालील यादीत समाविष्ट आहेत. २००५-०६ च्या सर्वेक्षणानंतर दोन टप्प्यांत ही यादी तयार केली गेली. यांपैकी २५ हजार कुटुंबीयांची नावे २००८ साली घोषित केली गेली, तर सूचना हरकतींच्या सुनावणीनंतर निश्चित करण्यात झालेली १५ हजार नावे अलीकडे घोषित करण्यात आली. मात्र, या दोन्ही याद्यांमध्ये काही नावे धनिकांची असून, सर्वेक्षणाचे वेळी त्यांनी खोटी माहिती िदल्याचे उघड झाले आहे.

आयुक्तांच्या मते अशी नावे कमी करण्याचा अधिकार मनपा प्रशासनाला आहे. अर्थात गोपनीय पद्धतीने प्राप्त होणाऱ्या या नावांबाबतचा अंतिम निर्णय पडताळणीनंतरच घेतला जाणार आहे. पडताळणीदरम्यान ते खरेच धनिक आहे का, त्यांच्या नावे शेती, घर अशी संपत्ती आहे का, त्यांच्याकडे मोठी वाहने चैनीच्या इतर वस्तू आहेत का? आदी बाबींची खात्री करून घेतली जाईल.

अशा प्रकारे कमी होणाऱ्या नावांच्या िठकाणी खऱ्या अर्थाने गरीब असलेल्यांची नावे समाविष्ट करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ िदला जाणार आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील यादीत गरिबांची नव्हे, तर धनिकांचीच नावे अधिक आहे, अशी ओरड करणाऱ्यांनी गोपनीयरीत्या ती माहिती मनपाला कळवावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवून प्रशासन त्या माहितीची पडताळणी करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
..तरच द्यावे लागेल शपथपत्र
आंदोलकांना ही नामी संधी
बीपीएल प्रमाणपत्रांमधील चुकीची नावे बदलण्यासाठी एनयूएलएम िवभागातर्फे आधी शंभरच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र मागितले होते. परंतु,आता ते कोणत्याही ओळखपत्राआधारे बदलवून दिले जावे, असे आयुक्तांचे आदेश आहेत. पत्नीच्या नावात बदल किंवा नाव पूर्णत: वेगळे असल्यास शपथपत्रच द्यावे लागणार आहे.

बीपीएल यादीत नावे समाविष्ट करण्याचा कोणताही अधिकार प्रशासनाला नाही. त्यामुळे बीपीएल यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी आग्रह धरणाऱ्यांसाठी किंवा प्रसंगी त्यासाठी आंदोलने करणाऱ्यांसाठी ही नामी संधी आहे. त्यांनी त्या भागातील धनिकांची नावे कळवल्यास त्या ठिकाणी खऱ्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केली करणे शक्य होणार आहे.
...तरच नवी नावे समाविष्ट होतील
बीपीएलच्यायादीत कोणतेही नवे नाव समाविष्ट करण्याचा मला अधिकार नाही. परंतु, खोट्या माहितीच्या आधारे ज्यांनी आपली नावे समाविष्ट केली आहे, तक्रारीअंती त्यांची चौकशी करून ती वगळण्याचे काम मात्र, मला करता येते. शासनाने या शहरासाठी विशिष्ट कोटा ठरवून दिलेला असल्याने त्याजागी खऱ्या गरिबांची नावे समाविष्ट करता येतील. चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका, अमरावती.