आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता चौपदरीकरण; 99 वृक्षांची कत्तल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अचलपूर- परतवाडा शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी एकूण 99 ब्रिटिशकालीन वृक्षांची कत्तल करण्यात आली. या डेरेदार वृक्षांची विल्हेवाट लावताना कोट्यवधी रुपयांच्या किमतीचे लाकूड गेले कुठे, हा प्रश्न सध्या अचलपूर-परतवाडा या जुळय़ा शहरांत चर्चेचा विषय बनला आहे. या वृक्षतोडीमुळे ऐन उन्हाळ्यात कडुनिंबाची गर्द सावली नाहीशी झाल्याने कधीकाळी हिरवेगार दिसणारे शहर आता भकास झाले आहे.
माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, अचलपूर शहरामधून जाणार्‍या राज्य मार्ग क्रमांक सहावरील दुतर्फा असलेली जयस्तंभ चौक ते बस स्थानक, विदर्भ मिल स्टॉप, फातिमा कॉन्व्हेंट या गजबजलेल्या भागातील ब्रिटिशकालीन झाडे बरीच जुनी झाल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद करून त्यांना तोडण्याच्या आवश्यकतेसह त्या 99 वृक्षांचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकामच्या अचलपूर उपविभागामार्फत मागवल्या गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आमदार बच्चू कडू यांनी आपल्या स्थानिक विकासनिधीतून 20 कोटी रुपये खर्चाच्या रस्ता चौपदरीकरणाचे जयस्तंभ चौकात भूमिपूजन केले.या वेळी 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे, स्मिता साळसकर व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी, शहरातील कृषिउत्पन्न बाजार समिती ते अंजनगाव नाका या जवळपास दीड किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेले 99 बहुवर्षीय वृक्ष समूळ उपटून काढण्यात आले. यात कडुनिंब, चिंच, पिंपळ यांचा समावेश आहे. या वृक्षतोडीकडे कुणीही फारसे गांभीर्याने बघितले नसले, तरी ज्येष्ठ नागरिक व निसर्गप्रेमींनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अपघाताचे कारण केले पुढे
तोडली गेलेली झाडे ही बरीच जुनी असल्याने तसेच काही झाडे आतून पोकळ झाल्याने वादळी पावसात झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळून अपघात झाल्याचे कारण सहायक अभियंता श्रेणी-एक उपविभाग अचलपूर यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. याच पत्रात आमदारांनीसुद्धा झाडांची पाहणी करून उपाययोजना करण्यासंबंधी तोंडी सूचना केल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र हिरव्यागार वृक्षांची कत्तल शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाकरिता करण्यात आल्याचे चित्र आहे.
आता उरल्या फक्त आठवणी
तोडलेल्या वृक्षांनी शहरातील तीन पिढय़ांना शेवटच्या क्षणापर्यंत सावली दिली. कधी काळी अनेक वाटसरू झाडाच्या सावलीत विसावले, तर याच डेरेदार वृ़क्षांच्या गर्द सावलीत बसून शेकडो फेरीवाल्यांनी आपला चरितार्थ सांभाळला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या एका साध्या कागदी आदेशाने 99 झाडांचा 99 वर्षांचा प्रवास क्षणात संपला.