परतवाडा- चलपूर पंचायत समितीची मासिक सभा घेण्यावरून अधिकारी व पदाधिकार्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने वार्षिक अर्थसंकल्पीय कृती आरखडा अद्याप मंजूर होऊ शकला नाही. अधिकार्यांच्या कार्यप्रणालीवर पदाधिकारी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
अधिकार्यांना पूर्वसूचना देऊनही मागील तीन मासिक सभांना ते गैरहजर राहिल्याबद्दल पदाधिकार्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे नियमाप्रमाणे मागील व येणारी मासिक सभा काही फरकाने घेणे प्रशासकीयदृष्ट्या आवश्यक असल्याचे अधिकारी सांगत आहेत. पंचायत समितीची मासिक सभा सात फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकूण आठ विषयांवर चर्चा होणार होती. मात्र, सभेला गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी गैरहजर राहिल्याने शेवटी सभा तहकूब करावी लागली. ही सभा गुरुवारी (दि. 6) घेण्याची विषयपत्रिका तयार करण्यात आली आहे. मात्र, त्यावर बीडीओ हस्ताक्षर करीत नसल्याचे सभापतींचे म्हणणे आहे.
सभेला अधिकारी गैरहजर राहत असल्याने अनेक महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी मिळू शकली नाही. अधिकार्यांच्या गैरहजेरीबद्दल सभापतींसह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.