आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर व्यापाऱ्यांचे बहिष्कारास्त्र, ५५ संघटनांनी घेतला बैठकीमध्ये निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती – जकात आणि एलबीटीच्या मुद्द्यावरून अमरावतीतील संतप्त व्यापाऱ्यांनी आता काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन पक्षांविरोधात रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत व्यापाऱ्यांतर्फे या दोन पक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पक्षाच्या नाशिक येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट अँड इंडस्ट्रीजने स्पष्ट केले आहे.
राज्यातील व्यापाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात सभा घेत हा निर्णय घेतला असल्याचे चेंबरने म्हटले आहे. मागील १५ वर्षांपासून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असून, सरकारने व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा चेंबरचा आरोप आहे.
मागील ३० ते ३५ वर्षांपासून व्यापारी जकात आणि एलबीटी विषयावर आंदोलन करत असून, या दोनही करांमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असतानाही सरकारने याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे चेंबरने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट अँड इंडस्ट्रीजची सभा नुकतीच केमिस्ट भवन येथे घेण्यात आली.
या बैठकीत व्यापाऱ्यांच्या विविध ५५ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात काँग्रेस-राष्ट्रवादीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चेंबरने स्पष्ट केले आहे.
भाजपने पत्र दिले; शिवसेनेचे आश्वासन
भाजपनेअधिकृत पत्र लिहून तर शिवसेनेने सांगली, सोलापूर येथील सभांमधून एलबीटी रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. एलबीटी हा महाराष्ट्राचा व्यापार बुडवणारा घटक असल्याने आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून त्याविरोधात लढतो आहोत. या निवडणुकीच्या निमित्ताने कुणीतरी आमची बाजू घेतली, ही व्यापारी वर्गासाठी आनंदाची बाब आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला. घनश्यामराठी, सचिव,चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट्स अँड इंडस्ट्रीज