आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्शल आर्टच्या जमान्यात अस्सल भारतीय ‘कॅलरी बर्न’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आधुनिक मार्शल आर्टच्या जमान्यात अस्सल भारतीय अन् ऐतिहासिक लाठी फिरवणे हा खेळ आपण विसरत चाललोय. मात्र, हा एक खेळ नसून ती एक कला आणि सर्वांगीण व्यायाम आहे. लाठी फिरवताना संपूर्ण शरीराची अतिशय वेगाने हालचाल होते. केवळ एक मिनीट सतत वेगाने लाठी फिरवल्यास शरीरातून घाम निघतो. म्हणूनच ‘कॅलरी बर्न’ करण्यासाठी हा खेळ उपयुक्त ठरू शकतो, असे मत या खेळातील तज्ज्ञ व्यायामपटू राजू महात्मे यांनी व्यक्त केले आहे.

लाठी, बनेठी या खेळाचा गेल्या ३० वर्षांपासून सराव करणारे, ही कला नानासाहेब दलाल यांच्याकडून शिकून जिवंत ठेवणारे जे काही बोटांवर मोजता येईल असे लोक आहेत, त्यांपैकीच एक महात्मे आहेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे.

त्यामुळे बहुतांश शेतकरी वर्ग हाती काठी घेऊन शेताकडे निघून जायचा. ही काठी त्यांना आधार वाटायची. कारण जंगली जनावरं, शत्रू यांच्यापासून ही लाठीच त्यांचे संरक्षण करायची. प्राचीन काळी प्रत्येकजण लाठी फिरवण्याची कला शिकूनच मोठा व्हायचा. पकडायला सोपी, वजनाने हलकी आणि परिणामकारकपणे प्रहार करणारी ही लाठी स्वरक्षणासोबतच तलवार चालवण्याआधी काही हात शिकण्यासाठी वापरली जायची. तिचे ऐतिहासिक महत्त्व असल्याचेही महात्मे यांनी सांगितले. चक्राकार, चौपदी, दौड, बनेठी असे या कलेचे विविध प्रकार असून त्यामुळे सर्वांगाला व्यायाम मिळतो. हातात काठी धरून ती फिरवावी लागत असल्यामुळे बोटं, मनगट, संपूर्ण हात, स्नायू, मान, चेहरा, पाय, खांदा, छाती आणि सतत गिरक्या घ्याव्या लागत असल्यामुळे पोटाला व्यायाम मिळतो, म्हणून याला सर्वांगीण व्यायाम संबोधतात.

अमेरिका, युरोपात महात्मे यांनी केला प्रचार-प्रसार
शहरातीलनामांकित सायकलपटू असलेल्या राजू महात्मे यांचा लाठी फिरवण्यात हातखंडा आहे. ते गेल्या ३० वर्षांपासून या खेळाची साधना तर करतातच; इतरांना नि:शुल्क प्रशिक्षणही देत आहेत. ही भारतीय स्वरक्षणाची कला लुप्त होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी डलास, अमेरिका, लंडन, युरोप, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात लाठी फिरवण्याची प्रदर्शन घडवून वाहवा मिळवली आहे.

जुनं तेच खरं सोनं
लाठी फिरवणे ही आपली स्वरक्षणाची कला आहे. ती वापरण्यावर कोणतीही बंदी नाही. बचावाचे ते एक स्वस्त आणि मस्त साधन आहे. विशेष बाब अशी, की लाठी कुठेही सापडते. हातात व्यवस्थित पकडता येईल अशा बांबूची हलकी मजबूत काठी फिरवणे मात्र तसे अवघड काम आहे. यात संपूर्ण शरीराचा कस लागतो. त्यामुळे जुनं सोडू नका, तेच खरं सोनं असल्याचे मतं महात्मे यांनी व्यक्त केले आहे.