आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती - भरधाव जाणार्या कारने बुलेटला दिलेल्या जोरदार धडकेत शहरातील दोन पोलिस शिपाई जागीच ठार झाले. राजापेठ-बडनेरा मार्गावर सातुर्णा एमआयडीसीनजीक शनिवारी रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. योगेश धनराज धोटे (34) आणि प्रमोद भास्कर गुट्टे (29) अशी ठार झालेल्या पोलिसांची नावे आहेत. हे दोघेही अमरावती पोलिस आयुक्तालयांतर्गत कार्यरत होते. यामुळे पोलिस विभागात हळहळ व्यक्त होत आहे. योगेश हे स्थानिक वडाळी परिसरातील गजानननगरचे रहिवासी होते. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर प्रमोदचे पार्थिव त्यांच्या लातूर जिल्ह्यातील एलदरी गावाला पाठवण्यात आले. योगेश हे गाडगेनगर पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते.
रविवारी पहाटे दोन वाजता हे दोघेही बुलेट (क्रमांक एमटीएक्स 6642) वर बडनेरा येथून अमरावतीकडे येत असताना सातुर्णा एमआयडीसीनजीक इंडिका कारने (क्रमांक एमएच 27 टीसी 27) बुलेटला धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती, की दोघेही पोलिस शिपाई जागीच ठार झाले. इंडिका कारच्या समोरच्या भागाचे यात मोठे नुकसान झाले. या प्रकरणी चालक सचिनला राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.