अमरावती- शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त घालणार्या चार्ली कमांडोंना वर्षभरात एकही संशयित शहरात आढळला नसल्याची धक्कादायक माहिती आहे. चार्ली कमांडोंच्या कार्यपद्धतीची ही आपबिती दस्तुरखुद्द पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनीच प्रसार माध्यमांसमोर कथन केली.
उपायुक्त घार्गे यांनी चार्ली कमांडोंना संशयितांवर कारवाईबाबत विचारणा केली. या वेळी एकाही संशयितावर कारवाई केल्याची नोंद नाही, ही बाब निदर्शनास आली. चार्ली कमांडोंच्या तोंडून हे ऐकून उपायुक्त घार्गेदेखील आश्चर्यचकित झाले. शहरात 35 चार्ली कमांडोंद्वारे टेहळणी केली जाते.
संशयास्पद फिरताना आढळणारी व्यक्ती, घटना, घडामोडी, गुन्हे यांवर नजर ठेवण्याचे कार्य चार्ली कमांडोंचे आहे. विशेष म्हणजे, या कमांडोंना मागील 365 दिवसांत एकही व्यक्ती संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आली नाही. शहरात रात्री-अपरात्री फिरणार्यांना चार्ली कमांडोंनी हटकलेदेखील नसल्याचे यावरून स्पष्ट होते, असे घार्गे यांनी स्पष्ट केले. ही माहिती उजेडात आल्यानंतर घार्गे यांनी कमांडोंना अत्यंत कडक शब्दांत ताकीद दिली आहे. रात्री फक्त मुख्य मार्गांवरूनच नव्हे, शहरातील अंतर्गत रस्त्यांवरूनही फिरा. वेगवेगळे नगर, कॉलनी अशा वस्त्यांमध्ये नागरिकांशी सुसंवाद वाढवून पोलिसांप्रति विश्वास निर्माण करा, असे स्पष्ट निर्देश कमांडोंना देण्यात आले आहेत.
एकाही घरफोडीच्या तपासात यश नाही
मागील महिनाभरात झालेल्या घरफोड्यांचा तपास करण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. 32 दिवसांत चोरी आणि घरफोडीच्या 47 घटना घडल्या आहेत. मात्र, एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिस यशस्वी झाले नाहीत, याची कबुली उपायुक्त घार्गे यांनी सोमवारी दिली. चोर्यांच्या तपासासाठी उपनिरीक्षक पठाण यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहिती हे पथक घेत आहे. अलीकडच्या घटनांतील बोटांचे ठसे शहरातील गुन्हेगांराशी जुळतात का, या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत. मात्र, अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही.