आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Government Squad In Amravati For Flood Area Survey

केंद्रीय पथक आज पश्चिम विदर्भात पाहणी करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अतिवृष्टी व पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पाहणी पथकाच्या चार चमू बुधवारी विदर्भात दाखल होत असून त्यापैकी दोन चमू अमरावती विभागाचा दौरा करणार आहे. या चमूतील सर्व अधिकारी उद्या सकाळी नागपुरात दाखल होत असून 10 वाजता दोन चमू नागपूरहून प्रयाण करेल.

यातील एक चमू अमरावती व अकोला जिल्ह्याचा दौरा करणार असून दुसरी यवतमाळ व वाशिम जिल्ह्याच्या दौर्‍यावर निघणार आहे. तब्बल साडे तीन तासाच्या दौर्‍यानंतर दुपारी दीड वाजता एक चमू अमरावती जिल्ह्यातील परतवाडा (ता. अचलपूर) येथे पोहोचेल. एक तासाच्या विर्शांतीनंतर चमूतील सदस्य नुकसानाच्या पाहणीसाठी धारणी तालुक्यातील सलोना येथे रवाना होतील. तेथील माहिती जाणून घेतल्यानंतर अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील जुना व नया अंदोरा येथील शेतीपिकाचे नुकसान आणि घरांची पडझड आदिंचा आढावा घेतला जाईल. दुसर्‍या दिवशी हीच चमू दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई व येवद्याला भेट देईल. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास तेथून नागपूरसाठी रवाना होईल.

दुपारी दीड वाजता यवतमाळात: याच पथकातील अन्य एक चमू यवतमाळकडे जाणार आहे. दुपारी एक वाजता यवतमाळात आगमन झाल्यानंतर तासाभराचा विर्शाम त्यानंतर आर्णी तालुक्यातील राणी धानोरा, महागाव तालुक्यातील तिवरगाव, उमरखेड तालुक्यातील पाळसी आणि पुसद तालुक्यातील शेती व इतर नुकसानाची पाहणी केली जाईल. दुसर्‍या दिवशी पुसदहून निघून दिग्रस मार्गे ही चमू मानोरा येथे पोहचेल. त्यानंतर मंगरुळपीर तालुक्यातील मोझरी व वाशिम जिल्ह्याच्या कारंजा लाड तालुक्यातील शिवणीत पाहणी होईल.