आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhatrapati Awarded Kiran Pethe Speaking With Dm Team

छत्रपती पुरस्कारानंतरही दिसत नाही आशेचा ‘किरण’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- क्रीडाक्षेत्रातील योगदानासाठी छत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतरही दर्यापूर शहरातील जुदोका किरण पेठे (बुंदेले) प्रसिद्धीच्या वलयापासून दूरच राहिल्या. पुरस्कारविजेत्या खेळाडूंच्या नावांची यादी जारी करताना त्यांचे शहर किंवा जिल्ह्याची माहिती राज्याच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास किरण यांनी कळवेपर्यंत जिल्ह्यातील खेळाडूंना प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनाही माहिती नव्हते.

अमरावती विभागातून केवळ दोन संघटकांनाच छत्रपती पुरस्कार मिळाल्याचा बरेच दिवस सर्वांचा समज होता. किरण यांना 2010-11 या क्रीडा वर्षासाठी हा पुरस्कार मिळाला, तोही विवाहानंतर. दर्यापूरमध्ये आदर्श प्राथमिक शाळा अन् रत्नाबाई राठी कन्या शाळा येथे शिक्षण घेत असतानाच सभ्यता स्पोर्ट्स क्लबमार्फत वयाच्या 14 व्या वर्षापासूनच किरण यांनी जुदो खेळायला सुरुवात केली. सहाव्या वर्गात शारीरिक शिक्षक उमा यांनी जुदो खेळात कारकीर्द करण्याचा किरण यांना त्या वेळी सल्ला दिला होता. शारीरिक क्षमता बघून बुंदेले यांनी प्रोत्साहनासोबतच मार्गदर्शनही केले.

दरम्यान, पटियाला येथील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत मुलींच्या 36 किलो वजनगटात त्यांनी सुवर्णपदक जिंकले. यानंतर त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी राहिली. पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत निवड झाल्यानंतर तेथे सहा वर्षे त्यांनी सराव केला. याच कालावधीत चेन्नई येथील ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत 52 किलो गटात सुवर्ण अन् भुवनेश्वर येथील स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. हरिद्वार व कोलकाता सिनिअर नॅशनल स्पर्धेत कांस्य, पुण्याला 2011 मध्ये झालेल्या अ.भा. विद्यापीठ स्पर्धेत आणि नंतर कोलकाता येथे 2012 मध्ये अमरावती विद्यापीठाला रौप्य जिंकून दिले. देदीप्यमान कारकीर्द घडवण्यासाठी आई-वडिलांसह प्रशिक्षक राजेंद्र पारडे, कविता गावंडे, राजू डे, डॉ. सतीश पहाडे आणि डॉ. पूनकर यांचे प्रोत्साहन लाभल्याचे पेठे सांगतात. अमरावती येथे शिवाजी शारीरिक शिक्षण कॉलेजात बी.पी.एड. केल्यानंतर अजूनही त्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

खेळाडू घडवण्याची इच्छा
छत्रपती पुरस्कार जाहीर होत असताना प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडूंच्या नावाची सचित्र यादी प्रसिद्ध होत असते. मात्र, माझ्याबाबत असे घडले नाही. कोणीही माझ्यापर्यंत पोहोचले नाही. त्याचे दु:ख मात्र नाही. जवळच्यांना आनंद झाला. त्यातच सर्व काही आले. दर्यापुरात मोठे बॅनर लावून माझे अभिनंदन करण्यात आले. तेवढय़ानेही आपण समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया किरण पेठे (बुंदेले) यांनी व्यक्त केली.

छत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. माहेरच्यांप्रमाणे सासरच्यांचेही प्रोत्साहन असल्यामुळे शारीरिक शिक्षक म्हणून नोकरी करण्याची इच्छा आहे. हातून काही चांगले खेळाडू घडावेत, असे त्यांना वाटते. भविष्यात स्वत:चा क्लब काढून त्यात खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचीही किरण यांची योजना आहे. यातून अमरावतीतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.