आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य विकासातून लोकशाही बळकट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘जगातीलअन्य देशांच्या तुलनेत भारतात तरुणांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अधिक तरुणपणाकडे जाणा-या भारताकडे अनेक देशांच्या नजरा वळल्या आहेत. तरुणांना योग्य शिक्षण कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाल्यास लोकशाही अधिक बळकट होईल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दी इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्राॅनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्स (आयईटीई ) तर्फे सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ४६ व्या अर्धवार्षिक राष्ट्रीय परिसंवादाचे उद््घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. ११) झाले. त्या वेळी ‘तंत्रज्ञानाचा कौशल्य विकासावर होणारा परिणाम’ या विषयाच्या अनुषंगाने ते बोलत होते.
आपल्या देशात पन्नास टक्के लोकसंख्या ही युवा वर्गाची असून, आगामी २५ वर्षांमध्ये भारत जगातील सर्वांत तरुण देश होणार आहे. तंत्रज्ञानाचा विकास होत असताना कौशल्यपूर्ण जगाला आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरवण्याचे कार्य आपण करू शकतो. त्याकडे आपण आव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भासारख्या भागामध्ये कौशल्य विकासाची खरी गरज आहे. आयईटीईने येथे कार्यक्रमाचे आयोजन करून आवश्यकता असलेल्या क्षेत्राला न्याय देण्याचे कार्य केले आहे. देशात खूप मोठ्या प्रमाणावर संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत. संशोधन हे सर्व समाजांतील तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी उपयोगात आणणारे असले पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी नमूद केले.
डॉ. स्मृती डागर यांनी आपल्या भाषणातून आयईटीई या संस्थेच्या कार्याचा मागोवा घेतला. तसेच डॉ. एम. एच. कोरी, डॉ. प्राचार्य एस. ए. लढके, प्रा. ए. पी. ठाकरे यांंनी विचार व्यक्त केले. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कै. अरविंंद उपाख्य भाऊ अनंत लिमये सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर दी इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्सच्या अध्यक्ष डॉ. स्मृती डागर, टीपीपीसीचे अध्यक्ष डॉ. एम. एच कोरी, डॉ. जे. डब्ल्यूू. बाकल, पी. के. जागिया, प्रा. अजय ठाकरे, डॉ. एस. ए. लढके आदी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी मंत्री जगदीश गुप्ता, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते. अजय ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. निक्कू खालसा राखी गुप्ता यांनी संचालन केले, तर डॉ. जे. डब्ल्यू. बाकल यांनी आभार मानले. या वेळी प्राध्यापक, विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित होते.
सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ४६ व्या अर्धवार्षिक राष्ट्रीय परिसंवादाप्रसंगी उपस्थित मान्यवर. दुसऱ्या छायािचत्रात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद‌्‌्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. छाया: मनीष जगताप

मान्यवर प्रेक्षकांमध्ये
आयईटीईराष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रमात पालकमंत्री प्रवीण पोटे यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नव्हते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आयईटीईचे पदाधिकारी वगळता अन्य कोणालाही स्थान देण्यात आले नाही. संस्थेचे अध्यक्ष जगदीश गुप्तादेखील प्रेक्षकांमध्येच बसले होते. पालकमंत्र्यांना व्यासपीठावर स्थान नसल्याची चर्चा मात्र सभागृहात सुरू होती.

परिषदेत पेपर प्रेझेंटेशन
यापरिषदेत पेपर प्रेझेंटेशन केले जाणार असून, प्राप्त १७८ पैकी १३६ पेपरची प्रेझेंटेशनसाठी निवड करण्यात आली आहे. इलेक्ट्राॅनिक्स टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांची आयईटीई भारतातील अग्रगण्य संस्था असून, एकूण एक लाख २५ हजार सदस्य आहेत. परमाणू, दूरसंचार, संगणक शास्त्र माहिती तंत्रज्ञान यामध्ये अभियंत्यांना नेतृत्व व्यावसायिक कलेमध्ये निपुण करण्याचे संस्थेचे ध्येय आहे.