आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखलदरा महोत्सवात प्रथमच व्हॅली क्राॅसिंग, ट्रेकिंगचा थरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चिखलदरा महोत्सवात प्रथमच व्हॅली क्रॉसिंग ट्रेकिंगचा थरार पर्यटकांना अनुभवता येणार असल्याची आनंददायक माहिती आहे. रूट तयार झाल्याने चिखलदऱ्यात २५ डिसेंबरपासूनच ट्रॅकिंग आरंभ होणार असल्याचे संकेत आहेत. दरवर्षी आयोजित होणाऱ्या चिखलदरा महोत्सवास या वेळेस नावीन्यपूर्ण चेहरा देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केला जाणार आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मेळघाटात चिखलदरा महोत्सवाचे ९, १० ११ जानेवारी १५ ला आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिकांना आपलासा वाटावा म्हणून या वेळेस प्रथमच महोत्सवाचे रेखाटन त्याप्रमाणे केले जाणार आहे. मुख्य कार्यक्रमस्थळ आणि विविध ठिकाणे स्थानिक आदिवासी संस्कृतीने यादरम्यान नटणार आहे. आदिवासी संस्कृतीशी जुळेल असे सभामंडप राहणार असून, मुख्य कार्यक्रमस्थळी गाविलगडाच्या प्रवेशद्वारासारखे प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. शिवाय चिखलदरा शहराच्या प्रवेश मार्गावर बांबूचे प्रवेशद्वार निर्माण केले जाणार आहे.
महोत्सवादरम्यान लावणीची सांस्कृतिक मेजवानी राहणार आहे. चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. यात उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या स्पर्धकास पाच हजार रुपयांचे प्रथम, तीन हजार रुपयांचे द्वितीय, दोन हजार रुपयांचे तृतीय तर एक हजार रुपयांचे दोन प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जातील. अकोला येथील विदर्भ साहसी ग्रुप तसेच युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने ट्रेकिंगचा थरार अनुभवास मिळणार आहे.
आणखी थरारक अनुभव
व्हॅली क्राॅसिंग, ट्रेकिंग यांसह अन्य थरार निर्माण करणाऱ्या साहसी खेळांचा यात समावेश आहे. यामध्ये पॅराग्लायडिंग, पॅरा सिलिंग तसेच हॉट एअर बलून प्रकाराचादेखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी महनि्यात आयोजित करण्यात आलेला महोत्सव रंगतदार होणार आहे.
आकर्षक कलादालन : स्थानिकआदिवासी संस्कृतीची ओळख निर्माण करून देणारे कलादालन तयार केले जाणार आहे. विविध बचत गटांचे स्टॉल माहिती वस्तू विक्रीकरिता येथे उपलब्ध करून दिले जाणार आहे. बांबू कलेचे प्रदर्शन, कार्यशाळादेखील आयोजित केली जाणार आहे. खऱ्या अर्थाने येथे साहस, थरार आणि संस्कृतीची उधळण होणार आहे.
सहभागींना आडनदीपर्यंत बसने प्रवास करावा लागेल कलालकुंडपर्यंत जाऊन परत तिथेच यावे लागेल. यात पर्यटकांना आनंददायी अनुभव येईल.