आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालदिनीही राबले चिमुकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंडित नेहरू यांच्या नावाने दरवर्षी बालदिन साजरा केला जातो. बालकांना जपण्यासाठी बालमजुरीविरोधी कायदा करण्यात आला. बालदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील एका दुकानावर छापा घालून प्रशासकीय यंत्रणेने मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला व आपली पाठ थोपटून घेतली. मात्र, प्रत्यक्ष बालदिनी शहरात अनेक बालके कामावर राबताना दिसली. प्रशासकीय उदासीनतेचे दर्शन घडवणारा ‘दिव्य मराठी’चा हा लाइव्ह रिपोर्ट..

बारमध्येही बालके
शहरातील पाच बीअर आणि वाइन बारमध्ये बालकामगारांचा सर्रास वापर होत आहे. रेल्वे स्टेशन, राजापेठ, पंचवटी परिसरातील हे बीअर बार आहेत. या बारमध्ये बालकामगारांना राबवून घेतले जाते, ही बाब कामगार विभागालादेखील माहिती आहे. मात्र, सायंकाळी सहानंतर कामगार विभाग मनुष्यबळ उपलब्ध करून देत नसल्याने कारवाई करणे अवघड झाले आहे.

येथेही दिसले चिमुकले
- जयस्तंभ चौकातील दोन हॉटेलमध्ये चिमुकले चहा, नाश्त्याची ने-आण करत होते.
- इर्विन चौकात रस्त्याच्या कडेला दोन चिमुकले स्टीलच्या वस्तूंना जंग चढू नये म्हणून पावडर विकत होते.
- अंबादेवी रोडवरील फुलांच्या दुकानांमध्ये, प्लास्टिकची विक्री करणार्‍या दुकानांमध्ये अनेक लहान मुलं-मुली दिसली. चौकशी केली, तर काही मालकांनी हे चिमुकले आपले मुलं, मुली असल्याचे सांगितले. काही मालकांनी मीडियाचे कॅमेरे पाहून या मुलांना भाचा, पुतणी, पुतण्या केले.

उपाशी पोट शिकवते काम
मी आईच्या पोटात होतो तेव्हाच वडील देवाघरी गेले. मला एक बहीण आहे. घरात मी, आई आणि बहीण असे तिघं जण राहतो. आई भांडे घासते. बहीण पाचवीपर्यंत शिकली. आता ती आईसोबत भांडी घासते. मग मलाही काम करावं लागतं. काम नाही केलं, तर घरी पैसे कमी पडतात. आता तुम्ही मला भांडे घासताना पाहत आहात. - अंकुश (बदललेले नाव), अंबागेट येथील हॉटेलमध्ये राबणारा चिमुकला

अंगाशी मस्करी करतात
माझं नाव .. जन्मतारीख माहिती नाही. पण, आई सांगते, मी 13 वर्षांची आहे. ती वारली, वडील आहेत. मजुरी करतात. पण, घर चालत नाही म्हणून मीही काम करते. हॉटेलातील भांडी घासते, फरशी पुसते. मला 120 रुपये रोज मिळतो. मालक रागवत नाही. पण, दुकानातील एक जण नेहमी माझी मस्करी करायचा. मी मालकाला सांगितले. त्यांनी त्याला हाकलून दिले. लता (बदललेले नाव), पंचवटी येथील हॉटेलमध्ये राबणारी बालिका