आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हातात द्या पुस्तक, पाटी..’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘एक साल मत और गंवाओ, तुरंत स्कीम मे नाम लिखाओ’, ‘हर बच्चे का है अधिकार, रोटी, खेल, पढाई और प्यार’, ‘हाती द्या पुस्तक, पाटी, नको गुरांना हाकायची काठी’, ‘बालमजुरी सोडा, शिक्षणाशी नाते जोडा’, ‘बालमजुरीचा धिक्कार, शिक्षण आमचा अधिकार’ अशा विविध घोषणांच्या माध्यमातून बालमजुरी रोखण्याचा संदेश गुरुवारी (दि. 12) देण्यात आला.
जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्त गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प विभागातर्फे दुचाकी वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. बालमजुरांना या प्रथेतून बाहेर काढून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच या प्रथेला आळा घालण्यासाठी विविध स्तरावरून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून वाहन फेरी काढण्यात आली होती.

विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी हिरवी झेंडी दाखवून फेरीचा शुभारंभ केला. प्रसंगी महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर कामुने, निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंह पवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी रवींद्र धुरजड, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प अधिकारी जाधव, पंकज छाबडा, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे संचालक प्रवीण येवतीकर, पंकज देशमुख, शिरीष देशमुख, प्रकाश गावफळे, संजय शहाकार, ललित ताथोडे, बबन हजारे तसेच विभागाचे अधिकारी, कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. सुंदरलाल चौक, यशोदानगर, दस्तुरनगर, राजापेठ, गांधी चौक, जवाहर गेट, इतवारा बाजार, कॉटन मार्केट, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, रेल्वे स्थानक चौक, इर्विन चौक हा रॅलीचा मार्ग होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला.

बुलेटचे ठरले आकर्षण : थम्पस रायडर्स बुलेट क्लबचे रायडर्सदेखील फेरीत सहभागी झाले होते. बुलेटचे विशेष आकर्षण असल्याने नागरिक थांबून बालमजुरी विरोधी दिनाचे महत्त्व जाणून घेत होते. त्याचप्रमाणे ‘शोषणापासून शिक्षणाकडे’ असा लोगो असलेले बॅच बिल्ले आणि ‘बालमजुरी सोडा’ असे नमूद केलेल्या टोप्या परिधान केलेल्या युवकांनी नागरिकांचे लक्ष वेधले. बालमजुरीविरोधात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था, चाइल्ड लाइन, प्रकल्पातील स्वयंसेवक तसेच प्रतिष्ठित नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.