आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगररचना विभागात ठणठणाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील सात लाख नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेल्या महापालिकेच्या सहायक संचालक नगररचना विभागात गेल्या काही दिवसांपासून नियमित कामेही होत नसल्याने आता नगरसेवकांनीदेखील ओरड सुरू केली आहे. विशेष म्हणजे, मनपाला उत्पन्न मिळवून देणार्‍या या विभागाकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे.

नगररचना विभागाच्या माध्यमाने बांधकाम परवानगी देणे, ले-आउटला मंजुरी देणे, अनधिकृत बांधकामे शोधणे अशी कामे केली जातात. यासोबतच शहर विकास आराखड्यासंदर्भात हाच विभाग काम करीत असतो. मनुष्यबळाचा अभाव असल्याने विकास आराखड्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यासाठी राज्य शासनाकडे विशेष चमूची मागणी करण्यात आली आहे. या विभागाच्या हातात सध्या जी कामे आहेत, त्यातील बरीचशी प्रलंबित असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या विभागात सहायक संचालक नगररचना, सह नगररचना अधिकारी, पाच कनिष्ठ अभियंता, पाच कारकून, चार ट्रेसर व अन्य कर्मचारी आहेत. असे असतानाही वरिष्ठ अधिकारीच राहत नसल्याने कामे मार्गी लागत नसल्याची ओरड होत आहे.

शहरात बांधकामाची अनेक प्रकरणे प्रलंबित असून नागरिकांना चकरा माराव्या लागतात. परंतु, कोणीही यासंदर्भात बोलण्यास तयार नाहीत. दरम्यान, या विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता एकही अधिकारी उपलब्ध होऊ शकला नाही. अधिकारी फोन उचलण्यासदेखील तयार नव्हते.

तक्रार सांगा, सोडवू
नगररचना विभागात सध्या किती तक्रारी प्रलंबित आहेत, याची माहिती घ्यावी लागेल. या तक्रारींची माहिती मिळाली, तर त्या सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. नव्या नगररचना अधिकार्‍याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही. बबलू शेखावत, सभागृहनेते, मनपा.

पूर्णवेळ अधिकारी हवा
2013 मध्ये विकास आराखडा तयार होणे अपेक्षित असताना ते काम सुरू झालेले नाही. या विभागात केवळ फायद्याची कामे होतात, जनहितार्थ कामांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे येथे कायमस्वरूपी अधिकारी असावयास हवा. डॉ. प्रदीप दंदे, नगरसेवक.

कामे ढेपाळली
सहायक संचालक नगररचना विभागात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने कामे ढेपाळली आहेत. येथील कारभार सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी अधिकारी देण्याची मागणी आम्ही शासनाकडे केली आहे. प्रा. प्रशांत वानखडे, विरोधी पक्षनेता, मनपा.