आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील रस्त्यांवर ‘धूळ’धाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चार दिवसांपूर्वी सर्वत्र कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरील डांबर वाहून गेल्याने रस्त्यांवर धुळीचे लोट उठत आहेत. शहरवासीयांच्या आरोग्यासाठी हे घातक असून, त्याचा सर्वाधिक फटका दुचाकीचालकांना बसत आहे.

पंचवटी ते बसस्थानक, राजापेठ मार्ग, कॅम्प ते इर्विन चौक, रेल्वे पूल या मुख्य मार्गांसह अनेक मार्गांवरील गिट्टी रस्त्यावर आलेली आहे. एकाच पावसात रस्त्यांचे पीतळ उघडे पडल्यामुळे रस्त्यांच्या दर्जाबाबत ओरड सुरू झाली आहे. निधी आल्यानंतर तो खर्च करण्यासाठी कामे करण्यात येतात. मात्र, ते काम किती दिवस टिकणार याच्याशी प्रशासन, पदाधिकारी व कंत्राटदारांना काहीही देणेघेणे नसते, हेच यातून स्पष्ट होते. प्रत्येकाच्या सोयीस्कर ‘अर्थ’कारणामुळे असले प्रकार घडत असल्याचे क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. शहरात कोट्यवधी खचरून करण्यात आलेल्या रस्त्यांचा एकाच पावसात गुळगुळीतपणा घालवला गेला असून, गिट्टी वर आली आहे. गिट्टी इतक्या प्रमाणात वर आली आहे, की रस्त्यांवर अध्र्यापेक्षा जास्त रुंदीवर केवळ गिट्टीचा थर साचला आहे. रस्त्यांवरील उखडलेल्या गिट्टीमुळे वाहनं घसरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या रस्त्यांवरून मोठी वाहनं गेली, की पादचारी, दुचाकीधारकांच्या अंगावर धुळीचे लोट उठतात. अनेकदा मोठय़ा वाहनांच्या चाकातून गिट्टी अडून ती मागे असलेल्या दुचाकीस्वाराच्या टाळक्यात लागते. डोळ्याला किंवा चेहर्‍यावर गिट्टी लागल्यास पादचारी, दुचाकीस्वारांना इजा पोहोचण्यासोबतच अपघातही होण्याची शक्यता असते.
‘धुळी’मुळे बळावतात आजार : रस्त्यावर उडणार्‍या धुळीमुळे श्वसनाचे, डोळ्यांचे आजार वाढण्याची शक्यता असते. अँलर्जी असलेल्यांना याचा चांगलाच त्रास होतो; तसेच वृद्धांनाही या धुळीमुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले आहे.