आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clashesh Between Two Groups In Chandur Bazar Amravati

चांदूरबाजारात सशस्त्र संघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदूरबाजार (अमरावती) - क्रिकेट खेळत असलेल्या मुलांचा धक्का लागून बुधवारी दुपारी क्षुल्लक वाद झाला. हा वाद क्षणार्धात विकोपाला गेला आणि दोन्ही गटातील व्यक्ती एकमेकांसमोर सशस्त्र उभे ठाकले. दोन्ही गटाने एकमेकांवर हल्ला चढवला. यामध्ये चांदूरबाजारच्या ठाणेदारांसह दोन पोलिस व दोन्ही गटातील सात जण असे एकूण दहा जण जखमी झाले. या वेळी संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण चांदूरबाजारमध्ये संचारबंदीसदृश स्थिती निर्माण झाली होती. मात्र, रात्री परिस्थिती नियंत्रणात व शांत असल्याचे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सांगितले.

दगडफेकीत चांदूरबाजारचे ठाणेदार भावसार, पोलिस कर्मचारी सै. अजमल सै. शौकत 26 रा. आसमा कॉलनी अमरावती आणि अन्य एक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. या सर्वांना उपचारासाठी अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मोतीलाल अहीर आणि शैलेश पांडे या दोघांच्याही डोक्यात गंभीर वार आहेत.

येथील स्टेट बँक चौकातील एका मैदानात काही मुलं क्रिकेट खेळत होते. याच दरम्यान दोन युवक दुचाकीने जात होते. खेळणार्‍या मुलांचा धक्का लागल्यामुळे दुचाकीचालक आणि त्या मुलांमध्ये क्षुल्लक वाद झाला, मात्र काही वेळातच हा क्षुल्लक वाद वाढला. दोन्ही गट एकमेकांसमोर मोठय़ा संख्येत आले. सर्वांच्या हातात लाठय़ा, काठय़ा व अन्य शस्त्र होते.

काही वेळातच दोन्ही गटाने दगडफेक सुरू केली. माहिती मिळताच ठाणेदार भावसार आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी रवाना झाले. जमाव हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या वेळी दगडफेकीत दोन कर्मचारी व ठाणेदार हेसुद्धा जखमी झाले.

दोन गटांत हाणामारी झाल्याची वार्ता संपूर्ण शहरात वार्‍यासारखी पसरली. काही वेळातच आणखी दुसर्‍या चौकात घटनेचे पडसाद उमटले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह परिसरातील अचलपूर, परतवाडा, मोर्शी, शिरजगाव कसबा या ठिकाणची अतिरिक्त कुमक तसेच दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. घटनेनंतर सायंकाळी संपूर्ण शहरातील बाजारपेठ बंद झाली होती. रस्ते शांत झाले होते. सर्व शहरात संचारबंदीसदृश स्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी दोन्ही गटातील व्यक्तींवर दगल, प्राणघातक हल्ला असे गुन्हे दाखल करून पोलिसांनी रात्रीपर्यंत दोन्ही गटातील दहा जणांना अटक केली होती.