आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लाउडी वेदर’चा जोर राहणार कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. बुधवारपर्यंत हे वातावरण कायम राहू शकते, असा अंदाज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बदलीचे वातावरण होते. रब्बी हंगामातील हरभरा, तूर या पिकांसाठी हे वातावरण दिलासा देणारे आहे. मात्र, कांद्याचे रोप आणि फुटलेल्या कपाशीचे अशा वातावरणातील पावसामुळे नुकसान होऊ शकते. या बाबत काही कापूस उत्पादकांनी चिंता व्यक्त केली, तर सततच्या ढगाळ वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखीसह तापाच्या आजारांनी डोके वर काढले आहे. शासकीय खासगी रुग्णालयात सध्या विषाणुजन्य तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात उपचार घेत असल्याचे चित्र आहे.
मंगळवार ते बुधवारपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहू शकते, असा अंदाज आहे. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात कमी ढगाळ वातावरण आहे. डॉ.अनिल बंड, हवामानतज्ज्ञ

जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे फुटलेला कापूस भिजला आहे. कडाक्याचे ऊन पडल्याशिवाय ओला कापूस सुकणार नाही. भिजलेल्या कापसामुळे उत्पादनाच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो. मात्र, यंदा थंडीत वाढ होऊन हरभरा पिकासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. अरुणमोटे, शेतकरी.