आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्‍यांनाच आचारसंहितेची धास्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात बुधवारपासून (दि. 5) निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामुळे ठिकठिकाणचे राजकीय पक्षांचे होर्डिंग, बोधचिन्ह दर्शवणारे पक्षांचे झेंडे, वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या दिमतीला असलेली सरकारी वाहने, विकासकामांच्या उद्घाटनाचे फलक आदी आचारसंहितेच्या व्याख्येत बसणार्‍या बाबी हटवण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे.
यात जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौरांनी बुधवारीच त्यांची शासकीय वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली, तर त्या पाठोपाठ जिल्ह्यातील नगरपरिषदांचे अध्यक्ष, जिल्हा परिषद आणि महापालिकेचे सभापती या सर्वांचीच वाहने जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सोळाव्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम संपेपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला विकासकामांचा शुभारंभ, भूमिपूजन, उद्घाटन इत्यादी थेट मतदारांवर प्रभाव टाकणारे कार्यक्रम घेता येणार नाही.
450 फलक काढले
निवडणुकीची घोषणा होण्याच्या तोंडावर शहरात मोठय़ा प्रमाणात राजकीय पक्ष तसेच इच्छुकांचे फलक लावण्यात आले होते. महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागाकडून ती फलके काढली जात आहेत. कालपासून फलक काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत या अंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात आलेले जवळपास 450 फलक महापालिकेतर्फे काढण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. ही मोहीम सुरूच राहणार आहे.