आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Collector Suspend Due To Corruption Case In Nandura

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाचप्रकरणी नांदुरा तहसीलदार निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदुरा - वाळूसाठय़ाची जप्ती आणि दंड टाळण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेणार्‍या नांदुरा येथील तहसीलदार इलियासखान रशिदखान यांना विभागीय आयुक्तांनी तकाफडकी निलंबित केले आहे. दरम्यान, निलंबन काळात त्यांचे मुख्यालय अकोला ठेवण्याबाबतही या संदर्भातील आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 24 जून रोजी नांदुरा येथे तहसीलदार इलियासखान रशिदखान यांच्या निवासस्थानी रात्री आठच्या सुमारास छापा मारून त्यांना 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. दरम्यान, 25 जून रोजी बुलडाणा न्यायालयाने त्यांना जामिन दिला होता. नांदुरा तालुक्यातील खेडगाव येथील सुरेंद्र जगदेव वानखेडे यांच्याकडे रमाई घरकूल योजनेतंर्गत घराचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी त्यांनी बांधकामासाठी पाच ते सहा ब्रास वाळू आणली होती. या वाळूचा साठा जप्त न करण्यासोबतच या प्रकरणात दंड न आकारण्यासाठी इलियासखान रशिदखान यांनी सुरेंद्र वानखेडे यांना 25 हजार रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी सुरेंद्र वानखेडे यांनी बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एस. एल. मुंडे यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह नांदुरा येथील तहसीलदार इलियासखान रशिदखान यांच्या निवासस्थानी सापळा रचला होता. त्यामध्ये रात्री आठ वाजेच्या सुमारास 15 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इलियासखान यांना रंगेहात पकडले होते. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला होता. 25 जून रोजी बुलडाणा न्यायालयाने त्यांना जामिन दिला होता. अशा स्वरुपांच्या प्रकरणात पोलिस कोठडीत राहावे लागल्यास संबंधित अधिकार्‍याचे कलम 80 नुसार मानीव निलंबन होत असते. त्यानंतर त्याला कायदेशीरदृष्या प्रस्ताव पाठवून प्रत्यक्ष निलंबनाची कारवाई करण्यात येते.
तहसीलदारपदाचा प्रभार शेलार यांच्याकडे
तहसीलदार पदावरून इलियासखान यांना निलंबित करण्यात आल्याने त्यांच्या पदाचा प्रभार नायब तहसीलदार ए. एन. शेलार यांच्याकडे देण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी निर्गमित केले असल्याची माहिती आहे.
विभागीय आयुक्तांनी केले निलंबित
24 जूनच्या या घटनेनंतर जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्त डी. आर. बन्सोड यांच्याकडे सविस्तर अहवाल पाठवला होता. त्याची शहानिशा करून विभागीय आयुक्तांनी 27 जून रोजी तहसीलदार इलियासखान यांना तडकाफडकी निलंबीत केले असल्याची माहिती आहे. सोबतच निलंबन काळात त्यांचे मुख्यालय अकोला राहील, असे स्पष्ट केले आहे.