आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकार्‍यांमधील मानवता जेव्हा गहिवरून येते..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- रविवारी पूर्णा नदीच्या पूराच्या रूपाने जिल्ह्यावर नैसर्गिक संकट कोसळले. कित्येक गावांना पुराचा वेढा पडून नागरिक व जनावर संकटात अडकण्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली. यामुळे इतर गावांतील लोकं हळहळली. जे संकटात अडकले होते, त्यांच्याबद्दल काळजी करू लागली; परंतु तशीच काळजी प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांनाही होती,त्यांनी भूक-तहान विसरून आप्तकालीन परिस्थिती हाताळून पूर्णेच्या पुराने वेढलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
जेवणाची वेळ झाली; तरीही आयुक्त महोदय घरी पोहोचले नाहीत म्हणून बंगल्यावरून सतत फोन येत होता. इकडे डिझास्टर मॅनेजमेंटबाबत बोलणे सुरू असल्याने ते (आयुक्त) फोनवर उपलब्ध होत नव्हते. शेवटी उपायुक्तांच्या मोबाइलवर साहेबांच्या जेवणाबाबत विचारणा झाली. कार्यालय सोडणे कठीण आहे, मला येणे जमणार नाही, असा संदेश द्यायला सांगितल्यावर डबा बोलावण्याची योजना तयार झाली. मात्र, पूर्णा नदीपात्रात (ब्राह्मणवाडा थडी) विजेच्या खांबावर अडकलेले नागरिक जोवर सहीसलामत बाहेर पडत नाहीत, तोवर माझा जीव कसा भांड्यात पडणार, हा प्रश्न उपस्थित करत आयुक्तांनी जेवणही थांबवले होते.
रात्री एकपर्यंत जागले अधिकारी
बचाव दक्षता पथकांना घटनास्थळी रवाना केल्यानंतर ‘रेस्क्यू ऑपरेशन’ पूर्ण झाले की नाही, हे जाणून घेण्यासाठी अधिकार्‍यांचे कान आतुर झाले होते. स्वत: आयुक्त-उपायुक्त रात्री दहापर्यंत आयुक्तालयात होते. जिल्हाधिकारी कार्यालयातही उपजिल्हाधिकारी रवींद्र धुरजड व राम सिद्धभट्टी कलेक्ट्रेटमध्ये तळ ठोकून होते. सर्व काही निस्तारले, पाऊसही थांबला, कोणीही कुठेही अडकले नाही, हे माहीत झाल्यावरच त्यांनी आपापली कार्यालये सोडली.
प्रसंग दोन : दुपारचे साधारणत: सव्वातीन वाजलेले. रविवार असल्यामुळे पुढील प्रवेशद्वार बंद होते. आरडीसींच्या कक्षाजवळील चिंचेच्या झाडाजवळ दक्षता पथकातील मंडळी जमली होती. तहसीलदार अनिल भटकर कर्मचार्‍यांना सूचना देत होते. दरम्यान, ट्रकमध्ये रबरी बोट ठेवली गेली. त्यानंतर दोन सुमो आणि ट्रक चांदूरबाजारच्या दिशेने निघाला. ‘डिझास्टर मॅनेजमेंट’साठी त्या भागात पाठविले जाणारे हे दुसरे पथक होते. त्याचवेळी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात राहुल महिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंग पवार, एसडीओ प्रवीण ठाकरे जिल्ह्याचा नकाशा बघत होते. ‘रेस्क्यू ऑपरेशन’साठी हेलिकॉप्टरची गरज भासणार असल्याने ते उतरवायचे कुठे, याचा शोध नकाशातून घेतला जात होता. दरम्यान, एसपी एस.वीरेश प्रभू तेथे पोहोचले. हेलीकॉप्टरचा तळ चांदूरबाजार किंवा लगतच्या बेलोरा येथे ठेवावा, यावर या तिन्ही अधिकार्‍यांचे एकमत झाले.
प्रसंग एक : वेळ दुपारी दीडची. दस्तुरखुद्द विभागीय आयुक्त दत्तात्रय बनसोड नोट पॅड व पेन घेऊन बसले होते. कानाशी भ्रमणध्वनी. चांदूरबाजार तालुक्यातील भयावह स्थितीची माहिती घेणे आणि त्याचवेळी संबंधित अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना देणे, असा क्रम सुरूहोता. अधून-मधून लँडलाइनही खणखणत होता. आयुक्त महोदय त्यावरही धरणांची स्थिती, त्यातील जलसाठा, किती दारे उघडली, किती उंचीपर्यंत उघडली आदी माहिती घेत होते. मध्येच मंत्रालयातून येणारा फोन, एनडीआरएफशी बोलणे, नोट पॅडवर टिपण घेणे या सर्व बाबी एकाचवेळी सुरू होत्या. स्वीय सहायक रवि मानकरही त्यांना मदत करीत होते. उपायुक्त रवींद्र ठाकरे यांनी स्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जलसंपदा विभागाच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. तोवर पूर्णा धरण फुटल्याची अफवा जोरात होती. त्यामुळे मूर्तीजापूरच्या आमदारांशी स्वत:हून संपर्क करीत ठाकरेंनी त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. दोन्ही अधिकार्‍यांचे सुरू असलेले हे डिझास्टर मॅनेजमेंट सुमारे तासभर अनुभवास आले.