आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांनी घेतला अर्थसंकल्पीय तयारीचा आढावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पातील तरतुदी, नागरिकांच्या अपेक्षा व जमा-खर्चाची तोंडमिळवणी करताना प्रशासनाला चांगलीच आकडेमोड करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त अरुण डोंगरे उपस्थितीत मंगळवारी सर्व विभागप्रमुखांची मॅरेथॉन बैठक झाली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, फेब्रुवारी महिन्यातच अर्थसंकल्प सादर करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पीय तयारीचा आढावा घेण्यात आला.


महापालिकेच्या सर्व विभागांनी अपेक्षित खर्च आणि उत्पन्नाचे विवरण सादर केल्यानंतरच लेखा विभागाकडून अर्थसंकल्प तयार केला जाणार आहे. त्यादृष्टीने आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना त्यांचे विवरण सादर करण्याचे निर्देश दिलेत.
लेखा विभागाने तयार केलेल्या अर्थसंकल्पाला आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्यावर हा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे मांडला जाईल. स्थायी समितीने मंजुरी बहाल केल्यास महापालिकेच्या आमसभेत 2014-15 या वर्षाचा अर्थसंकल्प ठेवला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महापालिका फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची दाट शक्यता आहे. लेखा विभागाकडून संपूर्ण वर्षाचे अर्थसंकल्प आणि चार महिन्यांचे लेखाअनुदान सादर केले जाणार असल्याची माहिती आहे.


अर्थसंकल्पातील त्रुटी आयुक्त पडताळून पाहतील व त्यासंबंधीच्या सूचना करतील. आयुक्तांनी सूचवलेल्या सुधारणा करून लेखा विभाग परिपूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. त्यानंतर आयुक्त त्याला मान्यता देतील. महापालिकेला अपेक्षित एलबीटी वसुली करता आली नाही. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात कपात केली जाणार की वाढ होणार, याबाबतची उत्सुकता ताणली आहे.