आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती लोकसभा जागेवर कॉँग्रेसने ठोकला दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सार्वत्रिक निवडणूकीत अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कॉंग्रेस पक्ष लढवेल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज अमरावतीत स्पष्ट केले. 12 ऑगस्टला मुंबई येथे होणार्‍या कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या समन्वय बैठकीत अमरावतीची जागा राष्ट्रवादीने सोडावी, असा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेसचाच उमेदवार हवा, अशी पक्षकार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. जिल्ह्यातील आमदार, महापालिका आणि जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी व पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे निवेदने दिली आहेत. त्यामुळे आता अमरावतीच्या जागेचा गांभीर्याने विचार सुरू केला असल्याचे ठाकरे म्हणाले. तथापि, 12 तारखेला होणार्‍या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने रिपाइंचे राजेंद्र गवई यांना निवडणुकीत उभे केले होते. मात्र, गवई यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव झाला. त्यामुळे या जागेसाठी आता पक्षकार्यकर्त्यांनीच हट्ट धरला आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेली ही जागा सहजासहजी कॉंग्रेसला मिळणार नाही. मात्र, आम्ही आमची भूमिका मांडू, चर्चेतून मार्ग काढू, असे ठाकरे म्हणाले.

सूत्र ठरलेले नाही

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील जागावाटप अद्याप झाले नसल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. 12 ऑगस्टला होणार्‍या समन्वय समितीच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. गेल्या निवडणुकीतील कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती आणि निवडणुकीचे नियोजन या दोन मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे ठाकरे म्हणाले.