आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Corporator Murder In Amaravati News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरसेवक शेख जफरसह नऊ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा; हबीब शाह यांच्या अंत्यविधीला हजारोंचा जमाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - काँग्रेस नगरसेविका फहेमिदा नसरीन यांचे पती हब्बू ऊर्फ हबीब शाह यांचा शनिवारी खून करण्यात आला होता. या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी नगरसेवक शेख जब्बार यांच्यासह अन्य आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला शनिवारी रात्री अटक केली आहे.

शाहबाज हुसेन (रा. हैदरपुरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख जफर, नगरसेवक रफ्फू पत्रकार, आसिफ काल्या, अब्बू बंजोटा, लच्छू, अकील भंगारवाला, नईम, शाकिर हुसेन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात हब्बूचा मृत्यू झाला; याचवेळी हब्बूचा भाऊ रशीद हा जखमी झाला. त्याच्याच जबाबावरून पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हब्बूच्या खुनापूर्वी शेख जफर काही समर्थकांसोबत हब्बूच्या घराजवळ आला, त्याने हब्बूला वाहनात बसण्यासाठी आग्रह केला. मात्र, हब्बूने वाहनात जाण्यासाठी नकार दर्शवताच आणखी काही हल्लेखोर आले. त्यांनी हब्बूवर हल्ला चढवला. तसेच हब्बूच्या बचावासाठी गेलेल्या रशीदला मारहाण करून रिव्हॉल्व्हर रोखल्याचेही त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे. उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिली. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हब्बूवर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले, या वेळी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. नागपुरी गेट भागातील हैदरपुरा आणि नुराणी चौकात शनिवारी सायंकाळपासूनच तगडा पोलिस ताफा तैनात करण्यात आलेला आहे. रविवारी त्यात आणखी वाढ करण्यात आली. खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पुढे आले असले, तरी वाद नेमका काय होता, याचा शोध पोलिस घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.