आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार शेखावतांना मारहाण : काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आमदार रावसाहेब शेखावत यांना गजेंद्र उंबरकर या युवकाने दहीदंडी उत्सवादरम्यान भरचौकात मारहाण केल्याने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. यानंतर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी बाजारपेठ बंद केली; तसेच पोलिस आयुक्तांविरोधात प्रचंड नारेबाजी करून मोर्चा पोलिस आयुक्त कार्यालयावर धडकला.

राजकमल चौकात नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरणावेळी उंबरकर याने रावसाहेबांना मारहाण केल्याने उपस्थित काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करत युवकाला कोतवाली ठाण्यात आणले. पक्षकार्यकर्त्यांना याची चुणूक लागताच त्यांनी ठाणे गाठून उंबरकरला ताब्यात देण्याची मागणी केली.

आयुक्तांच्या विरोधात नारेबाजीही करण्यात आली. संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बाजारपेठेतील दुकानांवर रोष काढण्यास सुरुवात केली. पटापट दुकाने बंद झाली. राजकमल चौकात शेकडो कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले. त्यात बबलू शेखावत, माजी उपमहापौर शेख जफर, मनोज भेले, धनंजय भुजाडे यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकार्‍यांचा समावेश होता. त्या ठिकाणाहून हा मोर्चा पोलिस आयुक्त कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. मार्गात येणारे प्रत्येक दुकान बंद करून मोर्चा सायंकाळी 7.30 च्या सुमारास आयुक्त कार्यालयावर पोहचला. मात्र, या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना कार्यालयात जाण्यास मज्जाव केल्यामुळे ते पुन्हा भडकले.

सर्वसामान्यांचे काय..?
आमदार रावसाहेब शेखावत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेर्धात शुक्रवारी शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. आमदाराच सुरक्षित नाहीत, तर सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल, त्यामुळे नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे. सुगनचंद गुप्ता, स्थायी समिती सभापती, अमरावती महापालिका.

पोलिस आयुक्तांच्या समक्ष थप्पड; खासदार, आमदार आयुक्तांच्या दालनात घटनेची माहिती मिळताच खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रवी राणा यांनी तातडीने आयुक्तालय गाठले. पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधीला मारहाण गंभीर बाब असल्याचे सांगून त्याच्यावर गंभीर कारवाईची अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली. याचवेळी आमदार राणा यांनी घटनेचा निषेध व्यक्त करून आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. पोलिस आयुक्तांच्या दालनात यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष संजय अकर्ते व अन्य हजर होते.

अपमान निंदनीय
शांतताप्रिय व्यक्तीवर हल्ला होणे चुकीचे आहे. त्या व्यक्तीने वारंवार रावसाहेबांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यामागे षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यक्तीचा रिमांड घेऊन त्या मागील सत्यता बाहेर काढली पाहिजे. लोकप्रतिनिधींवर केल्या गेलेला हल्ला निंदनीय आहे. नागरिकांनी शांत राहावे. आनंदराव अडसूळ, खासदार

वैमनस्यातून मारहाण
रावसाहेब शेखावत यांना वैयक्तिक आकसातून गजेंद्र उंबरकर याने मारहाण केली आहे. शेखावतांमुळे करिअरचे नुकसान झाले, असा त्याचा ग्रह आहे. कृत्य करण्यास मला कुणीही प्रवृत्त केले नाही, असे बयाण गजेंद्रने नोंदवले आहे. अजित पाटील, पोलिस आयुक्त, अमरावती.

मारहाण निंदनीय
अशा प्रकारे लोकप्रतिनिधींवर खुलेआम हल्ला होणे, हा प्रकार निंदनीय आहे. घडलेली घटना निश्चितच निषेधार्ह असून, हल्ला करणार्‍या गजेंद्रचा जुना वाद असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. सुलभा खोडके, माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

निषेधार्ह प्रकार
आमदार रावसाहेब शेखावत यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. पोलिस आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली असून, प्रकरणाला गांभीर्याने घेतले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष काँग्रेस (ग्रामीण)

आयुक्तांनी स्वत: बदली मागावी
पोलिस आयुक्तांसमोर लोकप्रतिनिधीवर हल्ला होत आहे. शहरात पोलिस आयुक्तांचा धाक कमी झाला आहे. पोलिस आयुक्त नसल्यासारखे शहर झाले असून, त्यांनी स्वत:हून बदली मागावी. अनेक धमक्या येतात, तक्रारी येतात. शहरात लोकप्रतिनिधी सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शहरात गुंडागर्दी वाढली आहे. रवी राणा, आमदार, बडनेरा.