आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Ncp Politics In Yavatmal City For Up Coming Election 2014

विधानसभा निवडणुकीतील नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादीसमोर काँग्रेसने अंथरल्या पायघड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - काँग्रेसचे नेते आपल्याकडे पायघड्या घालत आले, तरच आपण जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या सोबत आघाडी करण्याचा विचार करू शकतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप बाजोरिया यांनी केले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीतील आघाडीची गरज लक्षात घेता, काँग्रेस नेत्यांनी स्वत:हून बाजोरियांच्या दरबारात हजेरी लावल्याने अखेर जिल्हा परिषदेत या दोन पक्षांची आघाडी झाली. दरम्यान, जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्वाधिक जागा काँग्रेसकडे असल्याने काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर पायघड्या घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असली, तरी यवतमाळ जिल्ह्यात या दोन्ही पक्षांत वितुष्ट आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाजोरिया, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, आमदार वामनराव कासावार यांचा आपसातला वाद संपण्याचे नावच घेत नव्हते. नुकतेच आमदार बाजोरिया यांनी काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचा वारंवार अपमान करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे जिल्ह्यातून विसर्जन करण्याचे वक्तव्य पत्रकार परिषदेत केले होते. विशेष म्हणजे काँग्रेस नेते पायघड्या घालत आले, तरच त्यांच्या सोबत आघाडी करण्याचा विचार केला जाईल, असे वक्तव्य बाजोरिया यांनी केले होते. त्यानंतरही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार हे काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमदार बाजोरिया यांच्या कार्यालयात गेले आणि जिल्हा परिषदेत या दोन पक्षांनी आघाडी केली आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या अपमानापेक्षा निवडणूक महत्त्वाची
ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तर सातपैकी सहा जागा काँग्रेसला सुटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेसचे उमेदवार पाडू, विसर्जन करू, पायघड्या पाडायला लावू अशा प्रकारचे वक्तव्य करीत असले, तरी काँग्रेस नेत्यांना त्याची चिंता नाही. प्रदेशाध्यक्षांच्या अपमानापेक्षा विधानसभेची निवडणूक महत्त्वाची असल्याने काँग्रेसने तूर्तास नमते घेत बाजोरियांच्या दरबारात हजेरी लावली आहे.
काँग्रेसला ‘अल्टिमेटम’
जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावर काँग्रेससोबत आघाडी झाली आहे. मात्र, दिनांक १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत एकाही जागी काँग्रेसने बेईमानी केली, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील आघाडी मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही. संदीप बाजोरिया, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस.
हायकमांडचे आदेश
राज्यात विधानसभा सोबत लढायचे, हे दोन्ही पक्षांच्या हायकमांडने ठरवले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आघाडी करण्याचा आदेश आला होता. या आघाडीत स्थानिक नेत्यांचा संबंध नाही. राष्ट्रवादीच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते गेले. हा काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा निर्णय आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. अशोक बोबडे, काँग्रेस नेते, यवतमाळ.
विधानसभेचा संबंध नाही
काँग्रेस नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा घडून आल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीस्तरावर आघाडीचा निर्णय घेतला आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते सांगतील, त्यानुसार आम्ही निवडणुकीत काम करणार आहोत. आमचा अजूनही जिल्ह्यातील सातपैकी तीन मतदारसंघांच्या मागणीचा दावा कायम आहे.यासंबंधी वरिष्ठांना अवगत केले आहे. नाना गाडबैले, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
अशी झाली वाटाघाटी
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष राहणार आहे. उपाध्यक्ष पद काँग्रेसला देण्यात येणार आहे. याशिवाय दोन सभापतिपदे काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याठिकाणी काँग्रेसचे २२ तर राष्ट्रवादीचे २१ सदस्य आहेत, असे असतानाही अध्यक्ष मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार आहे.