आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress News In Marathi, Congress On Back Foot, Divya Marathi News

प्रचारात काँग्रेस बॅकफूटवरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दुफळी निर्माण झाल्याने पक्षातील मोठा गट सध्या तरी प्रचारापासून अलिप्त आहे. राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’च्या काट्याला काटा लावून चालणारी काँग्रेसही अद्याप प्रचाराबाबत बॅकफूटवर आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लोकसभेच्या सर्वच उमेदवारांनी जोमाने प्रचार सुरू केला आहे. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ महायुतीची महासभा अमरावतीमध्ये झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटातील प्रचार अद्यापही रंगलेला नाही. काँग्रेसला अमरावती मतदारसंघातून उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवायचा होता. या मागणीवर स्थानिक नेते आजही ठाम आहेत. राष्ट्रवादीमधून नवनीत राणा वगळता कोणालाही उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी होत होती. राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादीतूनच काहींनी बंडाचा झेंडा उभारला. मात्र, पक्षर्शेष्ठींच्या आदेशांनंतर हे बंड तूर्तास शमले.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, नवनीत राणा यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे उमेदवारी दाखल झाल्याशिवाय प्रचार कसा सुरू करायचा, हा आघाडीतील सहकारी पक्ष काँग्रेसचा युक्तिवाद कमजोर ठरला आहे.
आघाडीच्या उमेदवाराची उमेदवारी दाखल झाल्यानंतरच प्रचार आखड्यात उतरू, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर लक्ष लागून आहे. पडद्यासमोर चाललंय काय अन् पडद्याआड दडलंय काय, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यातच स्वपक्षीय राष्ट्रवादी आणि सहयोगी पक्ष काँग्रेस कुणीही प्रचारात पूर्णपणे पाठीशी न उभे राहिल्याने तूर्तास नवनीत राणा यांचा एकाकी प्रचार सुरू आहे.