आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Youth Festival Of Victory Weapon Display

युवक काँग्रेसच्या विजयोत्सवात शस्त्रप्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-‘हर हाथ तरक्की.’चा नारा देणार्‍या काँग्रेसच्या युवक आघाडीच्या निवडणुकीतील विजय आणि त्यानंतरचा आनंदोत्सव साजरा करण्याच्या नादात काहींनी चक्क सार्वजनिक स्थळी हाती शस्त्र घेऊन ढोल-ताशांच्या तालावर फेर धरला. हाती चाकू धरणारे काँग्रेसी की गैरकाँग्रेसी, हा संशोधनाचा मुद्दा ठरू शकतो. ते काँग्रेसी असतील, तर अशी ‘तरक्की’ साधणार का आणि काँग्रेसी नसतील, बाहेरचे घुसखोर असतील, तर इतके गाफील राहून काँग्रेसचा ‘युवा जोश’ कसा तरक्की साधेल, तरक्की कुणाची होणार सामान्यांची की गुंड प्रवृत्तीची असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोळक्यात शुक्रवारी काहींनी अतिउत्साहात हाती शस्त्र उंचावून शक्तीचे जाहीर प्रदर्शन केले. हे शस्त्र शेजारी असलेल्या अन्य कार्यकर्त्यांनी हिसकलेही.
या प्रकारावर पडदा पडत नाही, तोच दोन गटांत संघर्ष पेटला; नाचताना धक्का लागल्याचे निमित्त त्याला कारणीभूत ठरले. परंतु काँग्रेसच्या काही नेत्यांनी मध्यस्थी केल्याने विजयोत्सवाच्या आनंदावर पडणारे संभाव्य विरजण टळले. आनंदोत्सव साजरा करताना कार्यकर्ते अतिउत्साही दिसून आलेत.
अफाट जोश पाहून उपस्थित सर्वच कार्यकर्ते व युवक काँग्रेसचे पदाधिकारीही अवाक् झालेत. नाचताना धक्का लागल्याने जेव्हा युवक काँग्रेसमधीलच दोन गट समोरासमोर आले, तेव्हा यातील काही कार्यकर्ते वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या अंगावरही धावून गेले. वाद विकोपाला जाण्याची शक्यता बघता वरिष्ठ नेते पुढे सरसावले व त्यांनी वाद मिटवला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास या घटनेची माहिती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह आमदार व अन्य पदाधिकार्‍यांना मिळाली
‘ते’ काँग्रेस कार्यकर्तेच नाहीत
काँग्रेसमध्ये हाती शस्त्र घेऊन जल्लोष करण्याची संस्कृतीच नाहीत. धिंगाणा घालणारे लोक बाहेरचे असू शकतात. पक्षाला बदनाम करण्यासाठी मुद्दाम करण्यात आलेला हा प्रकार असू शकतो. माझ्यापर्यंत याबाबत विस्तृत माहिती आली नाही. अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.