आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साम, दाम झाले, आता बँकांना दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बैठकीला उपस्थित राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किरण गित्ते. )
अमरावती- कर्जपुनर्गठनाच्या बाबतीत साम, दाम खूप झाले, आता दंडाची कारवाई करून शासकीय निधीच या बँकांतून काढून घेण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांना देऊन चांगलेच ठणकावले. शुक्रवारी (दि. ३) पीक कर्ज पुनर्गठन आढावा बैठकीत गित्ते बोलत होते. बैठकीत पुनर्गठन केलेल्या कर्जातूनही बँकांनी जुने कर्ज कापून घेतल्याची बाब उघड झाल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून वसुली केलेली रक्कम परत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
मोजक्याच बँका वगळता इतर राष्ट्रीयीकृत बँकांची अद्यापही कर्ज पुनर्गठनासाठी टोलवाटोलवी सुरू आहे. मागील वर्षी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी कर्जफेड करू शकले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ३० जूनपर्यंत कर्ज पुनर्गठनाची मुदत संपल्यानंतरही जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी शंभर टक्के दिलेले लक्ष्य पूर्ण केल्याने शासनाने १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे भीषण आर्थिक समस्येत शेतकरी अडकला आहे. या वर्षी पुन्हा सध्या पावसाने दडी मारल्यामुळे भीषण संकटाची चाहूल लागली आहे.
गित्ते यांच्या विक्रमी बैठका
पीक कर्जाबाबत विदर्भातील कुण्याही जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात आढावा बैठका घेण्यात आल्या नाहीत. गित्ते यांनी विक्रमी बैठका घेतल्याची माहिती शिखर बँकेचे व्यवस्थापक अनंत खोरगडे यांनी दिली.
बँकांची अशीही बनवाबनवी
कर्जाचेपुनर्गठन केल्यानंतर त्यातून जुन्या कर्जाची वसुली केली जात असल्याची गंभीर बाब बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. बँकांच्या अहवालातील आकडेवारीतून ही बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे असा प्रकार केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम परत करण्याचे निर्देश गित्ते यांनी दिले.