आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटदाराचा प्रताप; पाइप लाइनला ठोकले बूच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विकासकामांसाठी पाण्याची चोरी उघड झाल्यानंतर ती पाइप लाइनच बंद करण्याचा कारनामा महापालिकेच्या कंत्राटदाराने केला. त्याच्या प्रतापाचा भुर्दंड सोसण्याची वेळ मात्र नाहक ग्राहकावर आली. ‘चोर तो चोर, वरून शिरजोर’ असा प्रकार या घटनेतून अनुभवास आला आहे. कॅम्प परिसरातील विद्याभारती महाविद्यालयासमोर नगरोत्थान योजनेतून मार्गाच्या सौंदर्यीकरणाचे काम केले जात आहे. त्यासाठी वापरलेले पाणी हे खोदकामादरम्यान तुटलेल्या घरगुती नळ कनेक्शनमधून घेण्यात आले होते.
‘दिव्य मराठी’ने हे उघड केल्यानंतर कंत्राटदाराने तातडीने पाण्याची चोरी थांबवली. पण, त्यानंतर चार ते पाच दिवसांपासून संबंधित व्यक्तीला पाणीपुरवठा होत नव्हता. याबाबत संबंधित व्यक्तीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे तक्रार केली होती. मात्र, पाणी मिळावे म्हणून खाजगी मजुरांकडून पाइप लाइन दुरुस्त करण्याखेरीज ग्राहकाकडे अन्य पर्याय नव्हता.
घरगुती नळाची पाइप लाइन खोदल्यानंतर पाणीपुरवठा न होण्याचे कारण स्पष्ट झाले. कंत्राटदाराने पाणी घेणे बंद केल्यानंतर पाइप लाइनला प्लास्टिकचे बूच लावल्याचे आढळून आले. ते बूच काढून नंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनी दुपारी या भागाची पाहणी केली. महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी विकासकामावर लक्ष ठेवून होते. या भागातील इतरांकडेही असा प्रकार झाला आहे का, याचीच चर्चा दिवसभर होती.