आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण पाडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मोजमाप करताना वाद घालून मनपा कर्मचाऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या मो. आबीद अ. मजीद सयानी यांचे अतिक्रमण सोमवारी पाडण्यात आले. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्वत: या कारवाईचे नेतृत्त्व केले. थेट घटनास्थळी त्यांची उपस्थिती असल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त मनपा पथकात दमदार अधिकाऱ्यांचा समावेश यामुळे विनासायास ही कारवाई पार पडली.
सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या नेतृत्त्वातील पथक मो. आबीद अ. मजीद सयानी यांच्या घरी गेले होते. मात्र त्यांचे बांधकाम अनधिकृत असल्यामुळे त्यांनी मोजमाप करण्यास मज्जाव केला होता. ही घटना घडल्यानंतर आयुक्त गुडेवार यांनी आबीदविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याची सूचना करतानाच अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस दिली होती.
या नोटीसनुसार आबीदने अतिक्रमण पाडले नाही. परिणामी आयुक्त गुडेवार यांच्या नेतृत्त्वात अतिक्रमणविरोधी विभागाचा ताफा दुपारी १२ च्या सुमारास पॅराडाईज कॉलनीत पोहोचला. तोपर्यंत मनपाच्या सेवेत असलेल्या पोलिस पथकासह गाडगेनगर ठाण्याचे पोलिस पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली गेली.
शेवटी आठ दिवसांची मागितली मुदत
ही कारवाई सुरु असतानाच मो. आबीद अ. मजीद सयानी याने आठ दिवसांची मुदत मागितली. त्या भागाच्या नगरसेविका लुबना तनवीर यांनीही या विनंतीवर भर दिला. त्यामुळे आयुक्त गुडेवार यांनी तशी मुभा दिली आहे. अतिक्रमीत बांधकाम आठ दिवसांच्या आत मी स्वत: पाडेन, तसे झाल्यास मनपा कारवाई करण्यास मुक्त आहे, असे आबीदच्या िवनंती अर्जात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?
पॅराडाईज कॉलनीमध्ये आबीदचे घर आहे. या घराच्या मागील भागात खुली जागा आहे. या जागेवर आबीदने उदबत्तीचा कारखाना बांधरा होता. दुमजली असलेल्या या कारखान्याच्या बांधकामाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. मनपा पथकाने इमारतीचे मोजमाप केल्यास आपला भंडाफोड होईल. त्यामुळेच आबीदने मोजणीस मज्जाव केला होता.