आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्शीत दोन गटांत संघर्ष: बाजारपेठ बंद; वाहनाच्या फोडल्या काचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्शी - पेट्रोलपंपावर उभा असलेल्या एका युवकाला दहा ते बारा जणांनी केलेल्या मारहाणीनंतर दोन गटांत संघर्ष झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद झाली असून, पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.

अमरावती मार्गावरील पेट्रोलपंपावर सायंकाळच्या सुमारास शहरातील एक युवक उभा होता. त्याचवेळी दहा ते बारा जणांच्या युवकाच्या गटाने युवकाला मारहाण केल्याने तो जखमी झाला. घटनेची माहिती युवकाच्या मित्रांना मिळताच ते जयस्तंभ चौक परिसरात रस्त्यावर आले. याचवेळी मारहाण करणाऱ्या गटाचे काही जण प्रत्युत्तर देण्यासाठी समोर आल्याने तणाव निर्माण झाला. यातील एका गटाने घटनास्थळावरून पळ काढल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेमुळे बाजारपेठ बंद करण्यात आली. याचवेळी अज्ञात नागरिकांनी रस्त्यावर उभ्या एका वाहनाच्या काचा फोडल्या. माहिती मिळताच मोर्शी पोलिस घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून दंगा नियंत्रक पथक, वरुड, शेंदूरनाघाट येथून अतिरिक्त कुमक बोलावली. सध्या परिस्थिती तणावपूर्ण परंतु नियंत्रणात आहे.

एसपी पोहोचले मोर्शीत
घटनेचीमाहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू मोर्शीत दाखल झाले आहेत. या वेळी मोर्शीतील संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने संचारबंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी शहरात ‘फिक्स पॉइंट’ तैनात केले असून, वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

दोन गटांतील संघर्षानंतर मोर्शी शहरातील व्यापाऱ्यांनी तत्काळ बाजारपेठ बंद केल्याने रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागू झाली होती.