आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्जन ठिकाणी प्रकाश, तर भरवस्तीत दाटला अंधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेचेशहर अभियंत्यांच्या घरावर लख्ख प्रकाश, तर दुसरीकडे शहरातील काही भाग अंधारात असल्याची विदारक स्थिती पाहावयास मिळत आहे. कोणी राहत नसलेल्या घरालादेखील प्रकाश देण्याची किमया महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. शेकडो नागरिक राहत असलेला भाग अंधारात ठेवला जात असून, अधिकाऱ्यांची घरे मात्र महापालिकेच्या विजेने प्रकाशमय होत आहे.
महापालिकेचे शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांचे तपोवन परिसरात नव्याने घर बांधण्यात आले असून, पथदिव्याच्या प्रकाशाने त्यांचे घर प्रकाशमय होत असल्याचे चित्र आहे. त्यांचे घर असलेल्या परिसरातदेखील अनेक नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो, शहर अभियंत्यांच्या घराजवळ मात्र महापालिकेकडून हायमास्ट लाइट लावला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ असलेल्या तपोवन परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती झाली आहे. तपोवन परिसरातील रामानंद रेसीडेन्सी, डोलारे ले-आउटमध्ये शहर अभियंत्यांच्या नवीन घराचे बांधकाम काही दिवसांपूर्वीच पूर्णत्वास आले आहे. शहर अभियंत्यांचे घर असलेल्या परिसरात महापालिकेकडून पथदिवा लावण्यात आला आहे. घरावर प्रकाश पडत राहील, अशा स्थितीत पथदिवा लावण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
जंगलाचा भाग असल्याने विजेची सुविधा मिळावी म्हणून येथील नागरिक मागील अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. येथील अनेक भागांमध्ये अद्यापही प्राथमिक सुविधांचा अभाव असून, नागरिकांना अनेक नागरी असुविधांचा सामना करावा लागतो. यासह शहरांच्या अनेक भागांमध्ये विदारक स्थिती असताना कोणी राहत नसतानादेखील शहर अभियंत्यांचे घर मात्र लख्ख प्रकाशात उजळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एकीकडे महापालिकेच्या अनेक भागांमध्ये अंधाराचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे मात्र अधिकाऱ्यांची घरे पथदिव्यांच्या प्रकाशाने उजळत असल्याचे चित्र आहे. पाठ्यपुस्तक प्रभागातील राममोहननगर, प्रवीणनगरातील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातून मार्ग शोधत जाण्याची वेळ येते. राममोहननगर, प्रवीणनगराप्रमाणे अन्य भागांतदेखील अनेक दिवसांपर्यंत पथदिवे बंद राहत असल्याचे चित्र आहे. अनेक दिवसांपर्यंत पथदिवे बंद राहत असताना त्याला दुरुस्त करण्यास अनेक दिवसांचा कालावधी लागतो. या बाबत शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांच्याशी संर्पक साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. पथदिव्यांच्या प्रकाशात महापालिका अधिकाऱ्याचे घर उजळून निघत आहे,तर बाजूला पाठ्यपुस्तक मंडळ परिसरामधील राममोहन नगरातील पथदिवे मागील आठ दिवसांपासून बंद असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.