आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करारनाम्यास बगल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेच्या व्यापारी संकुलांतील सुमारे 700 दुकानांचे करारनामे झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. मूळ मालक 350, तर दुय्यम मालक प्रकारातील 350 व्यापार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. करारनामा नाही, तर दुकान नाही, अशी भूमिका महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी घेतली.
महापालिकेच्या अखत्यारीतील विविध संकुलांतील व्यापारी करारनाम्यास बगल देत असतील आणि कर बुडवत असतील, तर त्यांची दुकाने ताब्यात घेण्याचे निर्देश आयुक्तांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत बाजार व परवाना विभागाला दिलेत. महापालिका संकुलामध्ये गाळे घेतल्यानंतर करारनामा केला जात नसल्याचा प्रकार समोर आला असून, अनेक व्यापार्‍यांकडे मोठय़ा प्रमाणात भाडे थकले आहे.
काही बड्या व्यापार्‍यांची थकबाकी 50 लाखांच्या घरात असल्याची माहिती आहे. उत्पन्नाचे स्रोत असलेल्या बाजार व परवाना विभागाकडे आयुक्तांनी लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता कर्मचार्‍यांनी कामाची गती वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच भाडे घेण्यास कर्मचारी कुचराई करीत असल्यास त्याच्या वेतनातून कपात केली जाईल आणि कोणी अडचण निर्माण केल्यास प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
बैठकीला महापालिका उपायुक्त रामदास सिद्धभट्टी, रमेश मवासी, सहायक आयुक्त राहुल ओगले, सहायक संचालक नगर रचना अधिकारी सुरेंद्र कांबळे, बाजार व परवाना विभागाचे अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, संगणक कक्ष दीपक खडेकर, उपअभियंता प्रमोद देशमुख, सहायक संगणक कक्षप्रमुख सचिन पोपटकर, सहायक रामदास वाकपांजर, निरीक्षक मानविराज दंदे व कर्मचारी उपस्थित होते.