आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेचार कोटींत ‘गोलमाल’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-शहरात 120 किलोमीटरच्या रस्त्याचे खोदकाम करून भूमिगत केबल टाकण्याच्या मोबदल्यात रिलायन्स कंपनीकडून महापालिकेला मिळालेल्या साडेचार कोटींबाबत लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या आक्षेपामुळे हा व्यवहार संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. अकोला महापालिकेत 89 किलोमीटर रस्ते खोदण्याच्या मोबदल्यात याच कंपनीने तेथील महापालिकेकडे साडेआठ कोटींचा भरणा केला. मोबदल्याच्या तफावतीमुळे व्यवहारातील पारदर्शकता जनतेसमोर उघड व्हावी, असा सूर उमटायला सुरुवात झाली आहे. भूमिगत केबल टाकण्यासाठी कंपनीकडून करण्यात येणार्‍या खोदकामाला महापालिकेने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

खोदकामाला सुरुवात
120 किलोमीटर रस्ते खोदून रिलायन्स कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सेवा विस्तारासाठी भूमिगत पाइपच्या माध्यमातून ही केबल टाकण्यात येत आहे. याआधारेच येणारी कित्येक वर्षे संबंधित कंपनी शहरात व्यवसाय करणार आहे. मात्र, या कामानंतर रस्त्यांची डागडुजी महापालिकेला करावी लागेल. यामध्ये कॉँक्रीटीकरण, डांबरीकरण, मातीकाम आणि पेव्हर ब्लॉक बसवणे यासारख्या कामांचा समावेश आहे. 120 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी साडेचार कोटींचे शुल्क कोणत्या आधारावर घेण्यात आले, या मुद्दय़ावरून महापालिका प्रशासनाला लोकप्रतिनिधींनी कात्रीत पकडले आहे. या प्रकरणामध्ये गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे केबलच्या खड्डय़ात पाणी तर मुरत नाही ना, असा सवाल लोकप्रतिनिधींनी केला आहे. दुसरीकडे महापालिकेने नियमांनुसारच रक्कम आकारल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

रस्त्यांवर होणार असा खर्च : कंपनीने खोदलेल्या 120 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे. डांबरीकरण करणे. मातीकाम करणे आणि नागरिकांसाठी रस्ते पूर्ववत करून देणे.

गतिमान इंटरनेटसाठी खोदकाम
संबंधित कंपनीच्या सेवा विस्तारासाठी शंभरहून अधिक टॉवर उभारले जाणार आहेत. गतिमान इंटरनेट सेवेकरता भूमिगत केबल टाकण्यात येत आहे. त्यासाठी हे खोदकाम सुरू आहे.

नियमानुसार आकारणी
कंपनीला खोदकामाच्या मोबदल्यात चार कोटी 59 लाखांचे शुल्क हे शासकीय नियमानुसार आकारण्यात आले आहे. कोणत्या दराने हे शुल्क आकारण्यात आले आणि झालेला व्यवहार याचा तपशील उपलब्ध आहे. अरुण डोंगरे, महापालिका आयुक्त.