आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस 4700 रुपये; यावर्षी 800 ने वधारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरात खासगी व्यापार्‍यांकडून कापसाच्या खरेदीला प्रारंभ झाला आहे. सध्या 4600 ते 4700 रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे.

शहरातील एदलजी, मालपाणी, पनपालिया या तीन खरेदीदारांनी खरेदी सुरू केली असून, त्यांनी आतापर्यंत अंदाजे 2000 क्विंटल कापूस खरेदी केला आहे. याला क्विंटलमागे 4600 ते 4700 रुपये दर दिला गेला.

जिल्ह्यात सध्या सीतादही सुरू असून कापसाच्या वेचाईला वेग आला आहे. मागील वर्षी शेतकर्‍यांना सुरुवातीपासून एप्रिलपर्यंत साधारणत: 3700 ते 3950 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. शेवटपर्यंत कापसाच्या दरात सुधारणा न झाल्याने शेतकर्‍यांनी नाइलाजाने मे महिन्यांपर्यंत कापूस विकून टाकला होता. जूननंतर कापसाच्या भावात सुधार होऊन तो पाच हजार रुपयांपर्यंत गेला होता. परंतु, तोपर्यंत बहुतांश शेतकर्‍यांनी कापूस विकून टाकला होता. मोजक्याच शेतकर्‍यांना पाच हजार रुपये दर मिळाला होता. त्या तुलनेत यावर्षी हंगामाच्या सुरवातीला कापसाला 700 ते 800 रुपये अधिक दर मिळत आहेत.

यंदा सोयाबीनच्या पेरणीक्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, कपाशीच्या क्षेत्रात घट झाली. शिवाय यावर्षी अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. कपाशीचे क्षेत्र घटल्याने उत्पादन कमी होऊ शकते. सध्या कपाशीवर लाल्याचे आक्रमण झाल्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.