आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाचे दर 4600 प्रतिक्विंटल; ‘रुई’घसरल्याने आवक मंदावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- रुई व सरकीचे दर घसरल्यामुळे कापसाच्या खासगी बाजारावर मंदीचे सावट असून, दर 4600 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले आहेत. परिणामी, आवकही मंदावली आहे.
कापसाचा हंगमा सुरू झाला; परंतु खर्चाच्या तुलनेत खासगी बाजारात मिळणारा दर अत्यल्प असल्यामुळे शेतकर्‍यांनीही कापसाची विक्री थांबवली आहे. परिणामी, खासगी जिनिंगमधील आवक मंदावली आहे. ग्रामीण भागात खासगी व्यापार्‍यांकडून 4400 ते 4600 रुपये दराने कापसाची खरेदी सुरू आहे. दोन आठवड्यांपूर्वी खासगी बाजारात कापसाचे दर 4700 रुपयांपर्यंत गेले होते. नेमाणी, एदलजी, मोसीकॉल, लकी आदी खासगी जिनिंगमध्ये कापसाची खरेदी सुरू आहे.
कापसाचे क्षेत्र घटले
मागील वर्षाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात मोठी घट झाली. जिल्ह्यात एक लाख 71 हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. ती यावर्षी एक लाख 29 हजार 400 हेक्टरपर्यंत खाली आली. कोरडवाहू पट्टय़ात कपाशीचे पीक समाधानकारक असल्यामुळे एकरी 15 क्विंटलपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता आहे. बागायती पट्टय़ामध्ये लाल्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
आशा कापसावर केंद्रित
सोयाबीनच्या उत्पादनात सपाटून नुकसान सहन केल्यानंतर शेतकर्‍यांच्या आशा सध्या कापूस, तूर व हरभर्‍यावर केंद्रित झाल्या आहेत. तूर व हरभर्‍याचे पीक हातात येण्यासाठी अद्याप बराच कालावधी असल्यामुळे शेतकर्‍यांनी अल्पदरामुळे कापसाची विक्री थांबवली आहे; परंतु बहुतांश शेतकर्‍यांना आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांना नाईलाजाने कापूस विकावा लागत आहे.
दर हवा सहा हजार
कपाशीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. मजूरटंचाईमुळे यात अधिक भर पडली आहे. कपाशीला सध्या सहा हजार दर मिळाला, तर कापसाची विक्री परवडणारी आहे.
-रामेश्वर काळमेघ, शेतकरी
आवकही मंदावली
कापसाची वेचाई सध्या मोठय़ा प्रमाणात सुरू आहे; परंतु बाजारात रुई, सरकी आदींचे भाव घसरले. याचा परिणाम कापसाच्या भावावर झाले असून, आवकही मंदावली आहे.
-शैलेश सनके, व्यापारी