आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल योजनेसाठीही आता मनपा घेणार विद्यार्थ्यांची मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-मालमत्तांच्या मोजमाप पाठोपाठ आता घरकुल योजनेसाठीही विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी एमए एमएसडब्ल्यू शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले अाहे. त्यांना प्रती विद्यार्थी प्रती दिवस २०० रुपयांचे मानधनही दिले जाणार आहे.

या मानधनातील १८० रुपये संबंधित विद्यार्थ्याला मिळणार असून, उर्वरित २० रुपये संबंधित विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिकतोय, त्या संस्थेला दिले जाणार आहे. अमरावती शहरात ४० हजार बीपीएल प्रमाणपत्रधारक आहेत. यातील आरक्षित जातसमूहातील नागरिकांना सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल बांधून मिळते. परंतु, मनपाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे लाभार्थी निश्चित करण्यात अडथळे निर्माण झाले आहे. त्यावर उपाय म्हणून आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी हा पर्याय निवडला असून, तो लवकरच अमलात आणला जाणार आहे.

मास्टर ऑफ आर्ट्स किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क्स या अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेही लघुशोधप्रबंध (डेझर्टेशन) सादर करावे लागतात. सदर सर्वेक्षणामुळे त्यांचा हा भागही पूर्ण होईल आणि ‘अर्न व्हाईल लर्न’ हे सूत्रही पाळले जाईल, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयांशी संपर्क करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

शौचालय, नळजोडणीचाही जनतेला मिळणार फायदा
शहराच्यागलिच्छ वस्त्यांमध्ये अनुसूचित जाती जमातीचे नागरिक वास्तव्याला आहेत. त्यांना शासकीय योजनेतून घरकुलासोबतच वैयक्तिक शौचालय नळजोडणीही दिली जाते. घरकुलांचे प्रस्ताव लवकर तयार झाल्यास संबंधितांना या योजनेचाही फायदा मिळणार आहे. शिवाय योजना असतानाही तिचा फायदा का नाही, अशी ओरड करणाऱ्यांनाही या प्रयोगामुळे दिलासा मिळणार आहे.