आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेविका पुत्राकडून देशी कट्टा केला जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरात चार दिवसांपूर्वी आरिफ लेंड्यावर झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी नागपुरी गेट भागात लक्ष केंद्रित केले आहे. या परिसरात अनेकांकडे अवैध शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे. याच माहितीच्या आधारे गुरुवारी रात्री उशिरा गुन्हे शाखा पोलिसांनी हबीबनगरमध्ये राहणाऱ्या एकाला पकडून त्याच्याकडून देशी कट्टा दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत. भुऱ्या ऊर्फ फिरोज शहा युसुफ शहा (२८, रा. हबीबनगर, अमरावती) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून देशी कट्टा जप्त केला आहे. भु-या हा नगरसेविका हाफीजा बी युसुफ शहा यांचा मुलगा आहे.
नागपुरी गेट परिसरात मागील दीड महिन्यांत पोलिसांनी पाच अवैध देशी कट्टे जप्त केले. याच काळात अवैध देशी कट्ट्यांमधून दोनवेळा गोळीबारसुद्धा झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यावरून या भागात अवैध शस्त्र असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, शस्त्र नेमके कुणाकडे आणि किती, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याच प्रयत्नात गुरुवारी रात्री गुन्हे शाखेला भुऱ्याकडे अवैध देशी कट्टा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास पोलिस पथकाने भुऱ्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. या वेळी त्याच्या जवळ देशी बनावटीची गावठी पिस्तुल दोन जिवंत काडतूस मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध नागपुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.

देशीकट्टा आला कुठून? : भुऱ्याचासंबंध नुकत्याच झालेल्या टोळीयुद्धासोबत आहे का, याचा पोलिस तपास करीत आहेत. त्याचा संबंध नेमक्या कोणत्या टोळीसोबत आहे? हा देशी कट्टा त्याचा आहे तर त्याने कोठून आणला, या सर्व बाबींचा पोलिस शोध घेत आहे.
पोलिसांसोबत हुज्जत; २२ जणांवर गुन्हे
गुरुवारी रात्री गुन्हे शाखा पोलिसांनी देशी कट्टा मिळाल्यामुळे भुऱ्याला अटक केली. या वेळी त्याच्या घरातील काही मंडळी सहकाऱ्यांनी पोलिस कारवाईला विरोध करून हुज्जत घातली. पोलिसांच्या कामात त्यांनी अडथळा निर्माण केला. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी भुऱ्याच्या काही नाते‌वाइकांसह २० ते २२ जणांविरुद्ध दंगा, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.