आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांनी पाहिला चोर, तरीही ठरला होता तोच शिरजोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शंकरनगरात एका घरातून 55 वर्षीय महिला बाहेर पडली. त्याच वेळी आलेल्या एका युवकाने तिला पत्ता विचारला. माहीत नसल्याचे सांगून ही महिला पुढे गेली. काही वेळानंतर ती परतली तेव्हा घराच्या उघड्या दारातून तोच युवक बाहेर पडल्याचे तिला दिसले. त्या चोरट्याला परिसरातील चार्ली कमांडोंनीही पाहिले. मात्र, काहीच माहिती नसल्याने त्यांनी त्याला हातदेखील लावला नाही. महिलेच्या घरातून या भामट्याने एटीएम कार्ड आणि बँकेची काही कागदपत्रे चोरली आहेत. हा प्रकार शनिवारी घडला.
अनुराधा अरुण कोल्हटकर (55 रा. शंकरनगर) असे त्या महिलेचे नाव आहे. सकाळी त्या दुकानात चालल्या होत्या. या वेळी घराचा दरवाजा बंद करताना एक 30 वर्षे वयोगटाचा युवक त्यांच्याकडे आला. त्याने पत्ता विचारला. मात्र, कोल्हटकर यांनी पत्ता माहीत नसल्याचे सांगत त्या पुढे गेल्या. काही वेळानंतर घरी परतल्या तेव्हा उघड्या दरवाजातून युवक बाहेर आला आणि सरंक्षण भिंतीवरून उडी घेऊन पळाला. मौल्यवान वस्तू हाती न लागल्याने त्याने एटीएम सोबत नेले. तोच चोरटा काही अंतरावर एका दुचाकीवर मागे बसलेला असल्याचे चार्ली कमांडोंना दिसला. मात्र, घटनाक्रमच माहिती नसल्याने त्यांनी त्याला हातदेखील लावला नाही. दरम्यान, चोरीची माहिती मिळताच त्यांनी कोल्टकर यांचे घर गाठले. घटनास्थळी पोहचल्यावर चोरट्याचे वर्णन ऐकून ते चकित झाले. तोपर्यंत चोरटा वाहनासह पसार झाला होता. या प्रकरणी राजापेठ पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी तातडीने आजूबाजूच्या एटीएमवर धाव घेतली तसेच संबधित एटीएम कार्डद्वारे व्यवहार थांबवण्यास बँकेलाही माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.