अमरावती - हातावरून भविष्य सांगण्याची बतावणी करून दोन भामट्यांनी 60 वर्षीय वृद्धेचे पाच ग्रॅमचे मंगळसूत्र लंपास केले. अकोली मार्गावर रविवारी सकाळी ही घटना घडली.
मनोरमा मधुकर ठाकरे (रा. पुरुषोत्तमनगर) असे महिलेचे नाव आहे. त्या एका खासगी रुग्णालयात काम करतात. शनिवारी रात्रीची ड्युटी आटोपून रविवारी सकाळी त्या घरी जात होत्या. अकोली मार्गावर दोन भामट्यांनी त्यांना तुमचे भविष्य पाहतो, गळ्यातील मंगळसूत्र काढा, पूजा करायची आहे, असे सांगून मंगळसूत्र पळवले. त्यांनी भविष्य पाहण्याचे पाच रुपयेसुद्धा घेतले होते. भामट्यांनी महिलेस खाली बसून पदर पसरवण्यास व पदरात पुडी टाकून घरी पोहोचल्यावर उघडण्यास सांगितले. भामटे निघून गेल्यावर मनोरमा यांना शंका आल्याने त्यांनी पुडी उघडून बघितली. त्यांना यात फक्त वाळू आढळली. या प्रकरणी ठाकरे यांनी राजापेठ पोलिसांत पाच ग्रॅमचे मंगळसूत्र पळवल्याची तक्रार दाखल केली.पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.