अमरावती - रात्री साडेआठच्या सुमारास मित्राच्या बाइकवर मैत्रिणीकडे निघालेल्या 21 वर्षीय युवतीला मारहाण करत, महामार्गावरील जंगलात नेत तिच्यावर तब्बल पावणेतीन तास सामूहिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी रात्री अमरावतीजवळ घडली.या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अवघ्या सात तासात अटक केली. सतीश शिवनाथराव जयस्वाल (32) आणि रूपेश हिम्मतराव वडतकर (30, दोघेही रा. रहाटगाव) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित युवती यवतमाळ जिल्ह्यातील असून, अमरावतीत बी.एस्सी.चे शिक्षण घेत आहे. तिचा मित्रही त्याच महाविद्यालयात आहे.
गुरुवारी निकाल घेण्यासाठी पीडित मुलगी गावाहून विद्यापीठात आली होती. रात्री एका मित्रासोबत बाईकवरून ती मैत्रिणीकडे निघाली होती. अमरावती- अकोला महामार्गावरील बंद पडलेल्या टोल नाक्याच्या अलीकडे हे दोघे उभे असताना पाठीमागून रूपेश व सतीश दुचाकीने आले. त्यांनी या दोघांनाही मारहाण करत महामार्गालगत असलेल्या जंगलात फरफटत नेले. तिथेही युवतीच्या मित्राला बेदम मारहाण करून त्याचे कपडे व मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर या दोन्ही नराधमांनी सदर युवतीवर अत्याचार केला व मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनाही सोडून दिले.
या घटनेनंतर युवक व युवती भेदरलेले होते. त्यांनी एका दुचाकीस्वाराच्या मदतीने पोलिसांपर्यंत माहिती कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही पीडितांना पोलिस ठाण्यात आणले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. आरोपींची दुचाकी तीन तास एकाच ठिकाणी उभी असल्याने मार्गाने जाणा-या एका व्यक्तीने पोलिसांना सांगितले. त्या माहितीवरून पोलिसांनी आधी रूपेशला व नंतर सतीशला शुक्रवारी सकाळी अटक केली. आरोपींनी याव्यतिरिक्त आणखी काही गुन्हे केले का, याचा तपास पोलिस करत आहेत.
अटकेपूर्वी रक्तदान
दोन्ही आरोपी गिट्टी, वाळू पुरवण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्कार, डांबून ठेवणे, मारहाण करणे, या कलमांन्वये गुन्हा दाखल केल्याचे पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. दरम्यान, सकाळी एका रुग्णाला रक्त देण्यासाठी सतीश डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रक्तदान होताच त्याला ताब्यात घेण्यात आले.