आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, House Breaking, Divya Marathi, Amravati

दरोडेखोरांचा अद्याप सुगावा लागला नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्ञानेश्वर कडू, ठाणेदार, बडनेरा - Divya Marathi
ज्ञानेश्वर कडू, ठाणेदार, बडनेरा
अमरावती - साईनगर भागातील चंदननगरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री रामचंद्र भालेराव यांच्या घरी दरोडा पडला. त्यांना मारहाण करून दरोडेखोरांनी ऐवज लुटला. या दरोडेखोरांचा शहर पोलिसांना अद्याप सुगावा लागला नाही. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी बडनेरा पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.

रविवारी गुन्हे शाखेचे पथक पुन्हा चंदननगर भागात गेले होते. या वेळी भालेराव यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांचा मोबाइल मिळाला. हा मोबाइल चोरट्यांनी घरातून नेला होता. शनिवारी पोलिसांना या मोबाइलची बॉडी मिळाली होती. रविवारी त्याच मोबाइलचे अंतर्गत सुटे भाग मिळाले आहेत. मात्र, यावरून पोलिसांना काही ठोस सुगावा मिळाला नाही. दुसरीकडे गुन्हे शाखेने शहरातील विविध भागात रस्त्यावर बसून जडीबुटी विक्रेत्यांची चौकशी सुरू केली आहे. यासाठी गुन्हे शाखेने सहायक पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, सहायक पोलिस निरीक्षक रवि राठोड आणि उपनिरीक्षक नितीन थोरात यांच्या नेतृत्वात तीन पथकांची नेमणूक केली. राजापेठ, गाडगेनगर आणि फ्रेजरपुरा विभागाच्या हद्दीतील रस्त्यावरील जडीबुटी विक्रेत्यांची चौकशी तसेच त्यांच्या वाहनांची झाडाझडती सुरू केली आहे. मात्र, अद्याप काहीही हाती लागली नसल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी सांगितले.

चोरटे झाले सावध
दरोडेखोरांनी भालेराव आणि याच परिसरातील प्रा. डांगरे यांच्या घरातून मोबाइल चोरले. मात्र, सोबत घेऊन न जाता त्यांनी घराबाहेर येताच ते फोडून टाकले. त्यामुळे पोलिसांना अद्याप तपासाची दिशाच गवसली नाही. यावरून चोरटे सावध झाल्याचे स्पष्ट होते.

पथक तयार केले
दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी आम्ही विशेष पथक तयार केले आहे. मात्र, अद्याप सुगावा लागला नाही. सर्वच दिशेने आम्ही दरोडेखोरांचा शोध घेत आहोत. ज्ञानेश्वर कडू, ठाणेदार, बडनेरा