आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Police Arrested Woman, Divya Marathi News

जिल्हा कचेरीतून ‘तिला’ पोलिसांनी घेतले ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या कक्षाबाहेर बराच वेळपर्यंत तळ ठोकून असलेल्या एका महिलेला अखेर गाडगेनगर पोलिसांना ताब्यात घ्यावे लागले. ही महिला महिवाल यांच्या कक्षाबाहेर नेमकी कशासाठी तळ ठोकून होती, याबद्दल महसूल विभागात उलटसुलट चर्चेला पेव फुटले होते.
तिशीच्या आसपास असलेल्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयातीलच एका अधिकार्‍यावर आपल्याशी संबंध ठेवल्याचा आरोप केला. त्याची तक्रार करण्यासाठी तिला जिल्हाधिकार्‍यांना भेटायचे होते, अशी चर्चा काही ठिकाणी होती. काहींच्या म्हणण्यानुसार, ही महिला महसूल विभागातच कार्यरत होती. सहा महिन्यांपूर्वी तिला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. निलंबन मागे घ्यावे म्हणून तिने महिवाल यांना भेटण्याचा तगादा लावला होता. काहींनी ही महिला मनोरुग्ण असल्याचे सांगितले. मात्र, यातील दोनच बाबींची अधिकृतपणे पुष्टी होऊ शकली. ती म्हणजे, ही महिला महसूल विभागात कार्यरत होती व पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ती मानसिकदृष्ट्या आजारी वाटत होती.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही महिला सुरुवातीला निवडणूक विभागाच्या आसपास वावरत होती. नंतर ती जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षाजवळ आली. त्यानंतर काहींनी दूरध्वनीवरून याबाबत गाडगेनगर पोलिसांना सूचित केले. जिल्हाधिकारी कार्यालय चौकात कार्यरत दोन महिला वाहतूक कर्मचार्‍यांच्या मदतीने तिला गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
याबाबत रात्री उशिरापर्यंत अधिकृतपणे कोणतीही नोंद नव्हती. परंतु, या घटनाक्रमाची चर्चा महसूल विभागात चांगलीच रंगली.
-अशी कोणतीही महिला आपल्यापर्यंत पोहोचली नाही. असा कोणता प्रकार घडला, याबद्दलची कल्पनाही नाही. चौकशी करून योग्य काय, ते सांगता येईल. राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी
मनोरुग्ण असावी
-आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातून निरोप मिळाल्यानंतर कर्मचार्‍यांना तेथे पाठवले. या महिलेच्या बोलण्यावरून ती मनोरुग्ण असावी, असे वाटते. याबाबत चौकशी सुरू आहे. दीपक करूलकर, निरीक्षक, गाडगेनगर.